
एकीकडे राज्याच्या अनेक भागांत अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. याचवेळी मुंबई शहर व उपनगरांत आतापासूनच वैशाख वणव्याचे चटके बसू लागले आहेत. गेल्या दोन दिवसांत तापमान 35 अंशांच्या आसपास पोहोचले आहे. मुंबईकरांची सकाळपासूनच लाहीलाही होत आहे. पुढील आठवडाभर तर पारा ‘छत्तीशी’पार मजल मारेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
कुलाबा येथील प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाच्या नोंदीनुसार बुधवारी सकाळी कुलाब्यात 27.5 तर सांताक्रुझमध्ये 26.8 अंश इतके किमान तापमान होते. गेल्या दोन दिवसांपासून सकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण राहत आहे. त्यामुळे किमान तापमानात वाढ झाल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. याचवेळी शहराचे कमाल तापमानही 35 अंशांवर पोहोचले आहे. पुढील आठवडाभर पारा 35-36 अंशांच्याच आसपास राहील. याचदरम्यान 10 आणि 11 मे या दोन दिवसांत काही भागांत पावसाची हजेरी लागेल. पुढील चार-पाच दिवसांत उत्तर हिंदुस्थानातील अनेक राज्यांत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्याचाही परिणाम मुंबईसह महाराष्ट्राच्या वातावरणावर होईल, असेही हवामान खात्यातील अधिकाऱयांनी सांगितले.






























































