मुंबईकरांची काहिली! ठाण्यात पारा 39 तर सांताक्रुझमध्ये 38.5 अंशांवर  

मुंबईमध्ये सूर्य आग ओकत असून पारा वाढल्याने नागरिकांच्या अंगाची काहिली झाली. बुधवारी कुलाब्यात 35.3 अंश तर सांताक्रुझमध्ये 38.5 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तर ठाण्याचा पारा थेट 39 अंशांवर गेल्याने ठाणेकरांचा चांगलाच घामटा निघाला. पुढील काही दिवस अशीच स्थिती राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मुंबईत गेल्या तीन ते चार दिवसांपासून शहरात कमाल तापमानात भर पडताना दिसत आहे. तापमान 37 अंशांपेक्षा जास्त नोंदवल्यानंतर भारतीय हवामान विभागाने कोकण प्रदेशासाठी मंगळवार आणि बुधवारी असे दोन दिवस यलो अलर्ट जारी केला होता. यानुसार तापमानात वाढ झाली आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, पुढील 24 तासांसाठी  मुंबई शहर आणि उपनगरात कमाल तापमान 39 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

नागरिकांनो काळजी घ्या 

उकाडा वाढल्यामुळे उष्माघाताचा धोका असून यामध्ये शरीराचे तापमान 104 फॅरनहाईटपर्यंत (40 डिग्री सेल्सिअस) पोहोचल्यास, तीव्र डोकेदुखी, मळमळणे, उलटीचा भास होणे, चिंता वाटणे व चक्कर येणे, हृदयाचे ठोके वाढणे, धडधडणे ही लक्षणे दिसतात. लहान मुलांमध्ये आहार घेण्यास नकार, चिडचिड होणे, लघवीचे कमी झालेले प्रमाण, शुष्क डोळे, तोंडाची त्वचा कोरडी होणे अशी लक्षणे दिसण्याची शक्यता आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

कुलाबा 35.3

सांताक्रुझ            38.5

ठाणे      39

डहाणू    38.2

रत्नागिरी            37.2