
मुंबईसह कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात उष्णतेची लाट असून गुरुवारी मुंबईच्या पाऱयाने थेट 39 अंशांच्या आसपास मजल मारली. सांताक्रुझमध्ये सरासरीपेक्षा 6 अंशांनी अधिक म्हणजेच 38.7 अंश इतक्या विक्रमी कमाल तापमानाची नोंद झाली. मुंबई शहर व उपनगरातील पाऱयाचा हा कहर पुढील साधारण पाच दिवस कायम राहील, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. अचानक झालेल्या या तापमानवाढीने मुंबईकरांची प्रचंड लाहीलाही झाली आहे.
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यासह मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून तापमान वाढले आहे. बुधवारी मुंबईच्या तापमानाने 38.1 अंशांची पातळी गाठली होती. गुरुवारी त्यात आणखी वाढ होऊन पारा थेट 39 अंशांच्या जवळ पोहोचला.
सांताक्रुझमध्ये 38.7 अंश, बोरिवलीत 38.4 अंश, चेंबूरमध्ये 38.7 अंश, कुलाब्यात 36.4 अंश, मुलुंडमध्ये 36.9 अंश, पवईत 35.8 अंश अशी सर्वत्रच तापमानवाढ नोंद झाली. एरव्ही शेजारच्या ठाणे जिल्ह्यात उन्हाची तीव्रता अधिक असते. गुरुवारी ठाण्यापेक्षा मुंबई शहरात रखरखाट होता. हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, मुंबई शहर व उपनगरात पुढील तीन दिवस तापमान 39 अंशांवर जाईल. त्यानंतर 38 आणि 37 अंशांची नोंद होईल. या तापमानवाढीमुळे मुंबईकरांची दुपारच्या सुमारास घराबाहेर पडताना प्रचंड दमछाक होत आहे.
समुद्राकडून जमिनीकडे वाहणारे मतलई वारे उशिराने वाहू लागले आहेत. त्यामुळे मुंबई व आसपासच्या परिसरातील उष्णतेत वाढ झाली आहे. मुंबईसह संपूर्ण कोकणपट्टय़ात पुढील साधारण पाच ते सहा दिवस उष्णतेची लाट असेल, असे भाकीत कुलाबा येथील हवामानशास्त्र विभागाच्या अधिकाऱयांनी केले आहे.




























































