
देशभर थंडीची लाट असताना मुंबईत मात्र पाऱ्याने ‘तप्तावतार’ दाखवून मुंबईकरांना घाम फोडला आहे. सोमवारी सकाळी तापमानात सरासरीपेक्षा तब्बल 6 अंशांची वाढ झाली. तसेच दिवसभराचे तापमान 4 अंशांनी वाढले. या तापमानवाढीमुळे नागरिक प्रचंड हवालदिल झाले.
हवामान खात्याच्या नोंदीनुसार, सोमवारी कुलाब्यात 23.5 अंश आणि सांताक्रूझमध्ये 23 अंश इतके किमान तापमान होते. दोन्ही ठिकाणी अनुक्रमे 4 आणि 6 अंशांची वाढ झाली. त्याचबरोबर सांताक्रूझचे कमाल तापमान पस्तीशीच्या जवळपास गेले. येथे कमाल तापमानाची सरासरीपेक्षा 4 अंशांनी अधिक म्हणजेच 34.5 अंश इतकी नोंद झाली. समुद्राकडून जमिनीच्या दिशेने वाहणाऱ्या वाऱ्यांना उशीर झाल्यामुळे मुंबईत अचानक तापमानवाढ झाली आहे. पुढील दोन दिवस उकाडा ‘जैसे थे’ राहील, असे हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

























































