मुंबई-ठाण्याची आता वेगवान कनेक्टिव्हिटी! मेट्रोच्या दोन नव्या मार्गिकांचे लोकार्पण, अंधेरीतून मीरा-भाईंदरपर्यंत थेट प्रवास शक्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई मेट्रोचे जाळे विस्तारले असून दोन नव्या मेट्रो मार्गिकांच्या लोकार्पणामुळे मुंबई-ठाण्याची कनेक्टिव्हिटी वेगवान बनणार आहे. मेट्रो-2 ब मार्गिकेतील डायमंड गार्डन ते मंडाले हा पहिला टप्पा आणि मेट्रो-9च्या दहिसर ते काशीगावपर्यंतच्या टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. दोन्ही मार्गांवर बुधवारपासून प्रवासी सेवा सुरू होणार आहे. मेट्रो-9 व मेट्रो-7 या मार्गिका दहिसर येथे जोडल्या असल्याने प्रवाशी अंधेरी येथून थेट मीरा-भाईंदरपर्यंत प्रवास करू शकणार आहेत. ‘मेट्रो-2ब’मुळे पूर्व उपनगरातील प्रवासाला गती मिळणार आहे.

मुंबईत मेट्रो मार्गिकांची कामे वेगाने सुरू आहेत. सद्यस्थितीत घाटकोपर ते वर्सोवा (मेट्रो-1), अंधेरी पश्चिम ते दहिसर पूर्व (2अ), दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व (7) आणि आरे जेव्हीएलआर ते कफ परेड (भुयारी मेट्रो) अशा चार मार्गिका प्रवाशी सेवेत आहेत. त्यात मंगळवारी मेट्रो-2 ब आणि मेट्रो-9 अशा दोन नव्या मार्गिकांची भर पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वप्रथम सकाळी दहिसर येथे मेट्रो-9 आणि दुपारी चेंबूर-डायमंड गार्डन येथे मेट्रो-2 ब (पहिला टप्पा) या मार्गिकांचे उद्घाटन केले. दोन्ही मार्गिकांवरील मेट्रो ट्रेनला मुख्यमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर दोन स्थानकांदरम्यान मुख्यमंत्र्यांनी मेट्रो प्रवास केला. सोहळ्याला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, मुंबईच्या महापौर रितू तावडे, स्थानिक लोकप्रतिनिधी, एमएमआरडीए व मेट्रोचे अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. मेट्रो-9 ही ठाणे जिह्यातील पहिलीच मेट्रो मार्गिका ठरली आहे, तर मेट्रो-2 बमुळे चेंबूर व आसपासच्या परिसरांसह हार्बर लाईनच्या महत्त्वाच्या भागांची कनेक्टिव्हिटी सुलभ झाली आहे. लोकार्पण सोहळ्यानिमित्त दहिसर पूर्व आणि देशभक्त ना.ग. आचार्य उद्यान-डायमंड गार्डन मेट्रो स्थानकांच्या प्रवेशद्वारांवर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. तसेच दोन्ही मार्गिकांवरील पहिली ट्रेनही फुलांनी सजवली होती. नव्या मेट्रो मार्गिकांमुळे उपनगरांतील प्रवासाला गती मिळणार आहे.

आजपासून प्रवासी सेवा सुरू

 मेट्रो-9 मार्गिकेवर एकूण 8 स्थानके असून पहिल्या टप्प्यात दहिसर पूर्व ते काशीगावपर्यंत बुधवारपासून प्रवासी सेवा सुरू होणार आहे. 4.7 किमीच्या पहिल्या टप्प्यात दहिसर-पूर्व, पांडुरंगवाडी, मीरागाव, काशीगाव अशी चार स्थानके आहेत.

 मेट्रो-2 ब मार्गिकेवर एकूण 19 स्थानके असून पाच स्थानकांवर बुधवारपासून प्रवासी सेवा सुरू होणार आहे. या टप्प्यात देशभक्त ना.ग. आचार्य उद्यान-डायमंड गार्डन चेंबूर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, देवनार, मानखुर्द, महाराष्ट्र नगर-मंडाले ही स्थानके आहेत.

महानगरातील प्रवास 59 मिनिटांत शक्य!

मेट्रोमुळे रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होणार असून पेट्रोलची बचत, प्रदूषणात घट तसेच वेळेची बचत होणार आहे. नागरिकांना जलद, सुरक्षित आणि आरामदायी प्रवास करता येणार आहे. मेट्रो मार्गिकांवरून 70 लाखांहून अधिक लोक प्रवास करू शकतील. त्यामुळे उपनगरी लोकलवरील गर्दीचा ताण कमी होईल. महानगरातील कोणत्याही भागात 59 मिनिटांत प्रवास करणे शक्य होईल, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. मेट्रोचे संपूर्ण नेटवर्क पूर्ण झाल्यानंतर मुंबई हे देशातील सुगम शहर बनेल, असेही त्यांनी नमूद केले.

महत्त्वाकांक्षी ‘पॉड टॅक्सी’ दीड वर्षात प्रवासी सेवेत

मुंबईतील आर्थिक केंद्र असलेल्या वांद्रे-कुर्ला संकुल येथे स्वयंचलित जलद वाहतूक प्रणाली अर्थात ‘पॉड टॅक्सी’ प्रकल्प साकारण्यात येणार आहे. देशातील या पहिल्यावहिल्या प्रकल्पाचे ई-भूमिपूजनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. ‘पॉड टॅक्सी’ प्रकल्पाचा पहिला टप्पा 20 महिन्यांत प्रवाशी सेवेत दाखल करण्याचा मानस आहे. या प्रकल्पामुळे वांद्रे-कुर्ला संकुल येथील वाहतूक अधिक सुलभ होईल. चालकाशिवाय चालणाऱया ‘पॉड टॅक्सी’मुळे मुंबईकरांना मॉल, कार्यालय वा अन्य इच्छित ठिकाणी पोहोचता येईल.

‘पॉड टॅक्सी’ची  एकूण 22 स्थानके

पॉड टॅक्सी मार्गिकेवर 22 स्थानके असून पहिल्या टप्प्यात कुर्ला (टर्मिनल स्टेशन), एलबीएस मार्ग, एमएमआरडीए पे अॅण्ड पार्क (जी ब्लॉक), बीडीबी गेट-11, वांद्रे पूर्व (टर्मिनल स्टेशन), कला नगर, जुनी एमएमआरडीए इमारत, उत्पादन शुल्क विभाग या स्थानकांवर प्रवाशी सेवा सुरू होईल.