मुंबई, ठाण्यात जोरदार सरींचा अंदाज, पावसाच्या चिखलात मतदानाचा टक्का घसरणार

356

विधानसभेसाठी सोमवारी होणाऱया मतदानावर पावसाचे सावट आहे. गेल्या दोन दिवसांपासून रिपरिपणाऱया पावसाचा पुढील 48 तासांत जोर वाढणार आहे. त्यामुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह पश्चिम महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसणार आहे, तर मुंबई, ठाणे, पालघरमध्येही जोरदार सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

शनिवारपासून रिपरिप पडणाऱया पावसाने ठिकठिकाणी चिखल झाला आहे. यामुळे घराबाहेर पडण्यास नागरिक कंटाळा करीत असतानाच मतदार मतदान केंद्रापर्यंत आणण्याचे आव्हान निवडणूक अधिकाऱयांसमोर राहणार आहेत. त्यातच लालबाग, शिवडी, घाटकोपरसह ठाणे शहर तसेच ग्रामीण भागात ज्या ठिकाणी मतदान केंद्रे मैदानात आहेत. त्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर चिखल झाला आहे. अशा परिस्थितीत खडी टाकून मतदारांना केंद्राजवळ पोहोचण्यासाठी रस्ता केला जात आहे. पण या चिखलात मतदार मतदानासाठी येतील का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे उद्याही पाऊस सुरूच राहिल्यास मतदान केंद्रांबाहेर प्रचंड चिखल होणार आहे. साहजिकच त्याचा परिणाम होऊन पावसाच्या त्या चिखलात मतदानाचा टक्का घसरणार असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या