
मुंबईत कोरोना पूर्ण नियंत्रणात आला असला तरी धोका अद्याप टळलेला नाही. दिल्ली, अहमदाबादसारख्या शहरांत पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आल्याने पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे. मुंबईत दिवाळीत झालेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर रुग्णसंख्या वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी घेतला आहे. त्याशिवाय ठाणे जिल्हय़ातील महापालिका, जिल्हा परिषद आणि खासगी शाळाही 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे. रायगड जिल्हय़ातील शाळांमधील नववी ते बारावीचे वर्ग मात्र सोमवारपासून सुरू होतील, असे सांगण्यात आले.

महाराष्ट्रात कोरोना नियंत्रणात आल्यामुळे 23 नोव्हेंबरपासून राज्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, मात्र शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीदेखील स्थानिक प्रशासनांनी कोरोना स्थिती पाहून निर्णय घ्यावा असे आदेश दिले आहेत. त्या दृष्टीने राज्यभरातील सुरू होणाऱया शाळा प्रशासनांनी आवश्यक तयारी सुरू केली आहे. विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित अंतर राखण्यासाठी व्यवस्था करणे, सॅनिटायझेशन करणे अशी कामे केली जात आहेत. असे असले तरी मुंबईत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर झालेली गर्दी पाहता पुढील किमान चार ते सहा आठवडे महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. या काळात रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे.
शाळा सुरू केल्यास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळेच मुंबईतील सर्व शासकीय आणि खासगी शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्यात येतील. त्यानंतर तत्कालीन परिस्थिती पाहून शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहितीही पालिका आयुक्त चहल यांनी दिली. दरम्यान, पालिका शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी यांनीदेखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद राहणार असल्याचे सांगितले. याबाबत शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी परिपत्रकही जारी केले आहे.
मुंबईत कोरोना नियंत्रणात आला असला तरी पूर्णपणे गेलेला नाही. पालक-विद्यार्थ्यांकडून सोशल मीडिया आणि इतर माध्यमातून शाळा सुरू करू नये अशी मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर मुंबईत 31 डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. – किशोरी पेडणेकर, महापौर
ठाणे जिह्यातील साडेसहा हजार शाळाही बंदच
दिवाळीनंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत रोज झपाटय़ाने वाढ होऊ लागल्याने ठाणे जिह्यातील महापालिका, जिल्हा परिषद आणि खासगी शाळाही 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने आज घेतला आहे. जिह्यात अंदाजे साडेसहा हजार शाळा आहेत. त्या सुरू होणार म्हणून शिक्षकांच्या टेस्टदेखील करण्यात आल्या. पण रुग्णसंख्या वाढत असल्याचे लक्षात येताच खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे जिह्यातील शाळा बंद ठेवण्याचे निर्देश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना दिले आहेत.
…तर कोरोनाची दुसरी लाट सगळय़ांना महागात पडेल! आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता
अनलॉक सुरू असले तरी जनतेने स्वयंशिस्त पाळणे आवश्यक आहे. शारीरिक अंतर राखणे, मास्क लावणे यासारख्या गोष्टी करायलाच हव्यात. नाहीतर कोरोनाची आणखी एक लाट येईल आणि ही लाट सगळय़ांनाच महागात पडेल, अशी चिंता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज व्यक्त केली. ते पत्रकारांशी बोलत होते. लॉकडाऊनच्या काळात घरात अडकून पडलेले आता अनलॉकमध्ये बाहेर पडले आहेत; पण त्यांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करायलाच हवे. कुणीही कोरोनाला गृहीत धरू नये. सर्वांनी काळजी घ्यावी, स्वयंशिस्त पाळली पाहिजे तरच कोरोनाच्या दुसऱया लाटेवर मात करणे शक्य होईल, असेही टोपे म्हणाले.
दिवाळीची गर्दी, लॉकडाऊन खुले झाल्यामुळे वाढलेली रहदारी त्यामुळे पुढील चार आठवडे कसोटीचे ठरणार आहेत. त्यामुळे पालिका या दिवसांत दररोज होणारी रुग्णवाढ, होणारे मृत्यू यावर लक्ष ठेवेल. कोरोनाला रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनाही सुरू राहतील.
मुंबई नियंत्रणातच
मुंबईत मे महिन्यात केवळ 4 ते 5 हजार कोरोना चाचण्या होत असताना सुमारे 500 पॉझिटिव्ह रुग्ण आढळत होते. मात्र आता चाचण्यांची संख्या 18 हजार म्हणजेच तिपटीने वाढवली असतानाही एक हजार रुग्ण आढळत आहेत. सद्यस्थितीत पॉझिटिव्ह रेट 5.9 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. ही स्थिती पाहता मुंबईत कोरोना पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे आयुक्त चहल यांनी सांगितले.




























































