
सामना ऑनलाईन। मुंबई
ट्रेन पकडण्यासाठीची घाई, स्टेशनवरची गर्दी, ही मुंबईकरांसाठी काही नवीन नाही. पण गुरुवारी मात्र चर्चगेट स्टेशनवर वेगळेच दृश्य पाहायला मिळाले. गर्दी तीच घाईही तशीच. पण ही घाई केवळ गाडी पकडण्यासाठी नव्हती तर होती लगीनघाई. सगळे प्रवासी सुहास्यवदनाने एकमेकांना अरे आले का रे सगळे .मुहुर्त टळतोय. मामाला बोलवा रे. आटपा रे लवकर. अशी घाई गर्दी करत होते. तेवढयात गर्दीतून एकाने अंतरपाट आणला. त्यासरशी सजूनधजून आलेला डब्यातील महिला वर्ग पुढे सरसावला. एकाने मोबाईलवर मंगलाष्टक सुरू केली. तसा सगळ्यांना चेव आला. जो तो येईल तसे मंगलष्टाक बोलायला लागला आणि बघता बघता ट्रेनमध्येच भगवान श्रीकृष्ण व तुळशीवर अक्षता पडल्या आणि नेहमीच्याच प्रवाशांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा थाटामाटात संपन्न झाला. ही ट्रेन होती रात्री ८.४१ ची चर्चगेट- विरार फास्ट.
गेल्या अनेक वर्षांपासून श्री स्वामी दर्शन रेल्वे प्रवासी भजन मंडळ हिंदू सण ट्रेनमध्ये साजरे करत आहे. याही वर्षी तुळशीचे लग्न लावत त्यांनी ही परंपरा कायम ठेवली. मंडळाचे सचिव हितेंद्र हावरे यांच्या मार्गदर्शनाखाली या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी डब्यात खास सजावट करण्यात आली होती.

डबाभर पताका व फुलांच्या माळा लावण्यात आल्या होत्या. यावेळी भगवान श्रीकृण आणि तुळशीला नववधू व वराप्रमाणेच सजवण्यात आले होते. पहील्यांदाच सहभागी झालेल्या पाहुण्यांची सरबराई करण्यात इतर प्रवाशीही दंग झाले होते. चर्चगेट स्थानकात असताना सुरू झालेला हा विवाहसोहळा नालासोपारा रेल्वे स्थानकपर्यंत संपन्न झाला आणि सगळ्यांनी एकच जल्लोष करत पेढा भरवून आलेल्या पाहुण्यांचे तोंड गोड केले.
दरम्यान लग्नानंतर प्रवाशांनी डब्यातील पताका काढल्या व डबाभर पसरलेल्या अक्षता गोळा करत डबा चकाचकही केला.





























































