तुमच्या आशा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही!

1586

लहान मुलांचे लसीकरण असो की साथीच्या रोगात घराघरात करावी लागणारी जनजागृती मुंबईपासून गावागावात आशा सेविका पोहोचतात. त्यांच्या मानधनात वाढ व्हावी यासाठी शिवसेनेने पाठपुरावा केल्याने त्यांच्या मानधनात दोन हजार रुपयांची घसघसशीत वाढ झाली. या मानधनावाढीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेकडो आशा सेविकांनी शिवसेना भवन येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा भेट घेऊन त्यांचे आभार मानले. यावेळी तुमच्या प्रत्येक अपेक्षा आणि आशा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले.

अंगणवाडी सेविका तसेच आशा सेविकांच्या मानधनवाढीबाबत उद्धव ठाकरे यांनी आग्रही भूमिका घेतली. विधान परिषद उपसभापती नीलम गोऱहे, आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी यासाठी जोरदार पाठपुरावा केला. यामुळे आशा सेविकांचे मानधन दोन हजार रुपयांनी वाढविण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागला. याचा लाभ राज्यभरातील 69 हजार आशा सेविकांना झाला. याबाबत आशा सेविकांचे नेते एस. ए. पाटील यांच्यासह शेकडो आशा सेविकांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या विषयी आपल्या वेगळ्या पद्धतीने तीन वेळा टाळ्या वाजवून फुले फुले फुले असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. त्याचप्रमाणे आपल्या काही मागण्यांचे निवेदनही उद्धव ठाकरे यांच्याकडे दिले. अशा सेविकांच्या प्रवर्तकांच्या मानधनात वाढ करणे, आशा सेविकांना सायकल पुरवणे तसेच प्रत्येक गावांत आरोग्य विषयक कामासाठी छोटे दवाखाने, आरोग्य केंद्र उभारणे अशा मागण्यांचे निवेदन उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात आले. यावेळी विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, शिवसेना नेते पर्यावरणमंत्री रामदास कदम, आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, शिवसेना सचिव विनायक राऊत आदी उपस्थित होते.

सायकल असो की दवाखाना; मागणी पूर्ण करणार

उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आशा सेविकांच्या मागण्यांबाबत आग्रही भूमिका घेईल. सायकलची मागणी असो की आरोग्य सेवा पुरविण्यासाठी दवाखाना उभारण्याची सूचना असो शिवसेना तुमची प्रत्येक अपेक्षा पूर्ण करील. आशा सेविकांचं एक नातं शिवसेनेसोबत आहे ते नाते टिकवून ठेवा. वचननाम्यातही या मागण्यांचा उल्लेख केला जाणार असून सरकार अल्यानंतर त्या मागण्या पूर्ण केल्या जातील, अशी ग्वाही दिली.

आपली प्रतिक्रिया द्या