अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्नांचे पूर्ण गुण मिळणार, परीक्षा मंडळ बैठकीतील निर्णय

सामना ऑनलाईन । मुंबई

विविध विद्याशाखांच्या परीक्षांमध्ये विचारण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्नांचे यापुढे पूर्ण गुण मिळणार आहेत. मुंबई विद्यापीठाच्या नुकत्याच झालेल्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर मे महिन्यात पार पडलेल्या केमिकल इंजिनीयरिंग आणि आयटी विषयांच्या गुणांचा तिढाही सुटला आहे.

केमिकल इंजिनीयरिंगच्या अप्लाइड मॅथ्सच्या प्रश्नपत्रिकेत 13 गुणांचे प्रश्न अभ्यासक्रमाच्या बाहेरील होते. तसेच 14 मे रोजी आयटी इंजिनीयरिंगच्या एसएमएमआर विषयाच्या 80 गुणांच्या प्रश्नपत्रिकेत 30 गुणांचे प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील होते. हे प्रश्न सोडविता न आल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार होते.

ही बाब लक्षात घेत युवा सेनेच्या वतीने सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर, वैभव थोरात, शशिकांत झोरे तसेच शीतल देवरुखकर-शेठ यांनी प्र-कुलगुरुंना निवेदन देऊन सईव विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्नांसाठी पूर्ण गुण देण्याची मागणी केली होती. तसेच यावर क्यकस्थापन परिषद सभेमध्येही आक्षेप घेतला.

  • अप्लाइड मॅथ्सच्या प्रश्नपत्रिकेत 13 गुणांचे बाहेरील प्रश्न होते. हे गुण विद्यार्थ्यांना देण्याचे परीक्षा मंडळाने मान्य केले.
  • एकूण 80 गुणांच्या एसएमएमआर विषयाच्या प्रश्नपत्रिकेत 30 गुण बाहेरील प्रश्नांना होते. पण परीक्षा मंडळाने 20 गुणांचे प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील असल्याचे मान्य करीत एकूण 60 गुण ग्राह्य धरीत पेपर तपासणार असल्याचे स्पष्ट केले.
  • उर्वरित दहा गुण हे अभ्यासक्रमातील आहेत याविषयी विद्यापीठाकडे सिनेट सदस्यांनी स्पष्टीकरण मागितले असून या दहा गुणांविषयी लवकरच भूमिका ठरविली जाणार आहे.
आपली प्रतिक्रिया द्या