
राज्यस्तरीय 21 व्या आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सव ‘इंद्रधनुष्य’मध्ये मुंबई विद्यापीठाने पुन्हा एकदा प्रथम क्रमांक मिळवत विजेतेपद पटकावले आहे. 5 ते 9 नोव्हेंबर दरम्यान कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे या स्पर्धा आयोजित करण्यात आला. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत 21 वेळा आयोजित केलेल्या या स्पर्धांमध्ये मुंबई विद्यापीठाने तब्बल 20 वेळा विजेतेपदाचा चषक पटकावला आहे.
संगीत, साहित्य, नृत्य आणि नाट्य या गटांतील स्पर्धांमध्ये विजयी सलामी देत सांस्कृतिक युवा महोत्सवामध्ये मुंबई विद्यापीठाने 111 गुणांची कमाई करत सर्वसाधारण विजेतेपद मिळवून अव्वल स्थान पटकावले आहे. विद्यापीठाने 6 सुवर्ण, 10 रौप्य आणि 1 कांस्य पदकांची कमाई करत चमकदार कामगिरी केली आहे. राज भवनद्वारे आयोजित या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सव ‘इंद्रधनुष्य’मध्ये 23 विद्यापीठे सहभागी झाली होती. कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी या यशाबद्दल विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
असे मिळवले यश
- मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेत्रातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भारतीय शास्त्रीय गायन, भारतीय समूह गायन, पाश्चिमात्य समूह गायन, पाश्चिमात्य एकल गायन, पाश्चिमात्य वाद्यवादन आणि मुकनाट्य या विभागातील स्पर्धांमध्ये 6 सुवर्ण पदके मिळवून निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे.
- यासोबत भारतीय शास्त्रीय तालवाद्य, लोकवाद्यवृंद, नाट्य संगीत, भारतीय शास्रीय नृत्य, भारतीय लोक नृत्य, एकांकिका, वत्कृत्व, प्रश्नमंजुषा, वादविवाद आणि छायाचित्रण या स्पर्धांमध्ये 10 रौप्य पदकांचा बहुमान मिळवला तर भित्तीपत्र स्पर्धेत 1 कांस्य पदकाने सन्मानित करण्यात आले.
- कुमारी निधी खाडीलकर आणि या हर्ष नकाशे या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन सर्वात जास्त बक्षिस मिळवून ‘गोल्डन गर्ल’ आणि ‘गोल्डन बॉय’चा किताब मिळवला. विद्यापीठाच्या 55 विद्यार्थ्यांच्या संघानी या सर्व कलाप्रकारात सहभाग घेतला होता.




























































