
सामना ऑनलाईन । मुंबई
निवडणुका म्हटल्या की मुंबईतील झोपडपट्टी ही हक्काची व्होट बँक म्हणून प्रत्येक निवडणुकीत पाहिले जाते. सर्वसामान्य मध्यमवर्गीय मतदारांबरोबर प्रामुख्याने झोपडीत राहणाऱ्यांना विविध आश्वासने देऊन खूश करण्याचा प्रयत्न केला जातो. ही व्होट बँक आता मुंबईतील मध्यमवर्गीय वस्तीबरोबर मलबार हिल, बोरिवली, कांदिवली, विलेपार्ले अशा उच्चभ्रू वस्तीकडे सरकताना दिसत आहे.
मुंबईच्या झोपडपट्टीत असणारी व्होट बँक आपल्यासोबत कायम ठेवण्यासाठी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही मतदारांना खूश करण्यासाठी काँग्रेसने झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत 500 फुटांचे घर देण्याच आश्वासन दिले होते. मतदानाच्या आदल्या दिवशी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी खास यासंदर्भात ट्विट करत मुंबईकर मतदारांना याची आठवण करून दिली. लोकसभा निवडणुकीत झालेल्या प्रत्यक्ष मतदानावर नजर टाकल्यास वर्षानुवर्षे मुंबईच्या झोपडपट्टीत असणारी ही व्होट बँक झोपडीतून टोलेजंग इमारतीत राहणाऱ्या मतदारांकडे सरकल्याचे दिसून येत आहे. परिणामी ज्या भागात सरासरी 50 टक्क्यांपर्यंत मतदानाची आकडेवारी गाठणेही मुश्कील होत होते अशा भागातही 55 ते 60 टक्के एवढे भरभरून मतदान झाल्याचे दिसून येत आहे.
टक्केवारी वाढली
मुंबईत यावेळी रेकॉर्डब्रेक 55.29 टक्के मतदान झाले. या मतदानात गरीब तसेच मध्यमवर्गीय मतदारांनी नेहमीप्रमाणे भरभरून मतदान केले. मराठी मतदारांनीही मोठय़ा संख्येने बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावला. यंदा पहिल्यांदाच उच्चभ्रू वस्तीत मोठय़ा प्रमाणावर मतदान झाले. 2014 च्या तुलनेत ही आकडेवारी पाच ते सहा टक्क्यांनी अधिक होती. उत्तर मुंबईत सर्वाधिक 60 टक्के मतदानाची नोंद झाली. या मतदारसंघात उच्चभ्रू वस्ती असलेल्या बोरिवली (66.2 टक्के), मागाठणे (57.7 टक्के), कांदिवली (55.7 टक्के), मालाड पश्चिमेकडे (56.9 टक्के) असे 55 टक्क्यांवर मतदान झाले आहे. त्यापाठोपाठ मुंबई उत्तर-पश्चिममधील उच्चभू वस्ती असलेल्या दिंडोशीत (60.4 टक्के), वर्सोव्यात (48.7 टक्के) इतके मतदान झाले. 2014 पेक्षा पाच ते सहा टक्क्यांनी मतदानात वाढ झाली आहे. मुंबई उत्तर-पूर्व भागात उच्चभ्रू वस्ती असलेल्या मुलुंड (63.7 टक्के), घाटकोपर पूर्व (61.3 टक्के) येथील मतदान तब्बल पाच टक्क्यांनी वाढले आहे. उत्तर-मध्य मतदारसंघातील उच्चभ्रू वस्ती असलेल्या विलेपार्ले (61 टक्के), वांद्रे पूर्व (52.7 टक्के) येथे मतदान झाले. दक्षिण-मध्य मुंबईत ज्या ठिकाणी मोठय़ा मतदानाची अपेक्षा होती तिथे केवळ 48 टक्के मतदान झाले, तर उच्चभ्रू वस्ती असलेल्या वडाळा (59.6 टक्के), माहीम (58.1 टक्के), चेंबूर (56.7 टक्के) इतके मतदान झाले आहे. दक्षिण मुंबईत मलबार हिल (56 टक्के) म्हणजे या मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले आहे.
मलबार हिल, बोरिवलीत सर्वाधिक मतदान
- उच्चभ्रू वस्ती असलेल्या मलबार हिल तसेच बोरिवलीत मोठय़ा प्रमाणात मतदान नोंदविण्यात आले.
- बोरिवलीत सर्वाधिक म्हणजे तब्बल 66.2 टक्के मतदान नोंदविण्यात आले. 2014 च्या तुलनेत 57.3 टक्क्यांवरून हे मतदान थेट 9 टक्क्यांनी वाढले.
- मलबार हिलसारख्या हायफाय वस्तीतही यंदा 56 टक्के मतदान नोंदविले गेले. 2014 च्या तुलनेत 53.7 टक्क्यांवरून 56 टक्के मतदान नोंदविले गेले.
विधानसभानिहाय मतदानाची टक्केवारी
मतदारसंघ 2019 2014
उत्तर मुंबई
- बोरिवली 66.02 57.03
- मागाठणे 57.07 50.08
- कांदिवली 55.07 54.00
- मालाड पश्चिम 56.09 51.04
उत्तर-पश्चिम
- वर्सोवा 48.07 43.02
- दिंडोशी 60.04 51.04
- गोरेगाव 56.00 49.09
उत्तर-पूर्व
- मुलुंड 63.00 58.09
- घाटकोपर पू. 61.03 57.00
उत्तर-मध्य
- विलेपार्ले 61.00 55.02
- वांद्रे पूर्व 52.07 47.04
दक्षिण-मध्य
- चेंबूर 56.07 51.09
- वडाळा 59.07 52.02
- माहीम 58.01 54.03
दक्षिण मुंबई
- मलबार हिल 56.00 53.07

























































