मुंबईसह पटना, जयपूर आणि वडोदरा विमानतळांना बॉम्बने उडविण्याची धमकी

देशात धमकीचे फोन, ईमेल येण्याचे सत्र सुरुच आहे. आता मुंबईसह पटना, जयपूर आणि वडोदरा विमानतळाला बॉम्बने उडविण्याची धमकी देण्यात आली आहे. ही धमकी ईमेलद्वारा देण्यात आली आहे. या धमकीनंतर चारही विमानतळावर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.

मुंबई विमानतळ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, देशातील वेगवेगळ्या विमानतळांना धमकीचे ईमेल मिळाले आहेत. त्यात मुंबई विमानतळाचाही समावेश आहे. ईमेल मिळाल्यानंतर सीआयएसएफचे पथक सतर्क झाले आहेत. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची कसून चौकशी केली जात आहे. तसेच विमानतळाच्या बाहेर उभ्या असलेल्या गाड्यांचीही तपासणी केली जात आहे. संशयास्पद काही गोष्टी दिसल्यास तत्काळ हटविण्यात येतील. त्यासाठी कसून चौकशी केली जात आहे.

धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर गुजरातच्या वडोदरा विमानतळावर खळबळ उडाली आहे. वडोदरा पोलिसांचे एक पथक तत्काळ विमानतळावर पोहोचले आणि त्यांनी सीआयएसएफसह येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू केली. खबरदारी म्हणून अग्निशमन दलाचे जवानही तैनात करण्यात आले. विमानतळ ज्या भागात येतं ते हर्णी पोलीस स्टेशन आहे.

जयपूर विमानतळावर धमकीचा ईमेलही आला होता. ईमेलमध्ये विमानतळावर बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात आली होती. सुरक्षा यंत्रणांनी विमानतळावर शोधमोहीम राबवली. बॉम्बशोधक पथकाने विमानतळावर तपास केला. जयपूर विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे काही खोडकर लोकांचे कृत्य आहे. पोलीस पथक याप्रकरणी तपास करत आहे. आयपी ॲड्रेसवरून धमकीचा मेल पाठवणाऱ्या व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत. तसेच बिहारच्या पाटणा येथील जयप्रकाश नारायण विमानतळालाही उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल आला होता. ईमेल पाहिल्यानंतर विमानतळाची सुरक्षा वाढवण्यात आली.