
मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी विलेपार्ले पूर्व येथील पारसीवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अभिनयातल्या या देवमाणसाला अखेरचा निरोप देण्यासाठी कलाक्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती होती.
हृदयविकाराच्या धक्क्यामुळे बुधवारी रात्री नऊच्या सुमारास ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे कोकिलाबेन रुग्णालयात निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे चित्रपट-नाटय़सृष्टीत शोककळा पसरली आहे. दरम्यान, गुरुवारी सकाळी रमेश देव यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या वर्सोवा येथील निवासस्थानी ठेवण्यात आले होते. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, विनय येडेकर, महेश मांजरेकर, रजा मुराद, विजय कदम, आशुतोष गोवारीकर, मकरंद देशपांडे, महेश कोठारे आदींनी अंत्यदर्शन घेतले.
बाबांच्या आठवणींत अजिंक्य देव भावुक
दरम्यान, बाबांना अखेरचा निरोप देताना अभिनेता अजिंक्य देव यांना अश्रू अनावर झाले. ‘हा देव कुटुंबीयांसाठी दुःखाचा दिवस आहे. अस्वस्थ वाटल्याने बाबांना काल रुग्णालयात दाखल केले. सायंकाळी सहा वाजेपर्यंत आम्ही एकत्र होतो. त्यांनी बराच वेळ आमच्याशी गप्पा मारल्या. काही वेळासाठी मी ऑफिसला गेलो तितक्यात ही धक्कादायक बातमी कानावर आली. बाबांचे जगण्यावर प्रचंड प्रेम होते. याआधी अनेकदा ते मृत्यूच्या दाढेतून परत आले होते. या आजारातूनही ते बरे होतील असे वाटत होते. मात्र, असे काही होईल याची जराही कल्पना नव्हती असे सांगतानाच अजिंक्य देव यांना अश्रू रोखता आले नाहीत.


























































