
सामना प्रतिनिधी। मुंबई
दरवर्षी 7 जूनपासून सुरू होणारा पावसाळा या वर्षी मात्र बराच लांबणार असल्याचे हवामान खात्याने छातीठोकपणे सांगितले असताना मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया तलावांतील पाण्याची पातळीही खाली गेल्याने पावसाळय़ाआधीच मुंबईचे पाणी संपणार आहे. त्यामुळे 15 जूनपासून मुंबईला राखीव कोटय़ातून पाणीपुरवठा केला जाणार आहे. यामध्ये 1 जून रोजी उपलब्ध असणारे 1,43,859 आणि भातसा-वैतरणातील 1 लाख 70 हजार दशलक्ष लिटर राखीव असे 3,13,859 दशलक्ष लिटर पाणी उपयोगी पडणार आहे.
मुंबईला मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा सात धरणांमधून दररोज 3800 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. पावसाळा संपल्यानंतर 1 ऑक्टोबरला उपलब्ध पाण्याचा आढावा घेतला जातो. यावेळी सातही तलावात मिळून वर्षभरासाठी 1447363 दशलक्ष लिटर पाणी असणे आवश्यक असते, मात्र या वर्षी 1 ऑक्टोबरला तब्बल दोन लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा कमी असल्याचे समोर आले. या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाणीसाठय़ातून पावसाळय़ापर्यंत पुरेशा पाणीपुरवठय़ाचे नियोजन करण्यासाठी नोव्हेंबर 2018 पासून मुंबईत 10 टक्के पाणीकपात सुरू करण्यात आली आहे.
पालिका म्हणते, जुलैपर्यंत पाणी पुरणार
पालिकेकडे सध्या उपलब्ध असणारे 3,13,859 दशलक्ष लिटर पाणी जुलैपर्यंत पुरणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुंबईत आणखी पाणीकपात करणार नाही, असेही पालिका प्रशासनाने म्हटले आहे. असे असले तरी वाढलेल्या उकाडय़ामुळे बाष्पीभवनामुळे मोठय़ा प्रमाणावर पाणीसाठा कमी होत असल्यामुळे मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.
उपलब्ध पाणीसाठा
1 जून 2019 – 143859 दशलक्ष लिटर
राखीव पाणीसाठा 170000 दशलक्ष लिटर
एकूण – 313859 दशलक्ष लिटर
पाणीसाठय़ाची तुलनात्मक आकडेवारी
1 जून 2019 – 143859 दशलक्ष लिटर (9.94 टक्के)
1 जून 2018 – 283764 दशलक्ष लिटर (19.61 टक्के)
1 जून 2017 – 293507 दशलक्ष लिटर (20.28 टक्के)
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया तलावांत या वर्षी कमी पाणीसाठा उपलब्ध असला तरी मुंबईकरांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यात येईल. या पार्श्वभूमीवर योग्य पाणीपुरवठा करण्यासाठी उपलब्ध पाणीसाठय़ाचा आढावा घेतला असून नियोजनपूर्वक पाणीपुरवठा करण्याचे निर्देश प्रशासन आणि संबंधित विभागाला देण्यात आले आहेत.
विश्वनाथ महाडेश्वर, महापौर































































