शुद्धतेच्या चार चाचण्या केल्यानंतर होतो मुंबईला पाणीपुरवठा

577

मुंबईकरांना मिळणारे पाणी हे शुद्धीकरणाच्या तब्बल चार चाचण्या पार केल्यानंतर पुरवले जाते. यामध्ये पालिकेच्या पिसे पांजरापूर आणि भांडुप जल शुद्धीकरण केंद्रावर गाळ वेगळा करणे, फिल्टरेशन, क्लोरिनेशन आणि प्रयोगशाळेत चाचण्या केल्या जातात. यामुळेच मुंबईकरांना सर्वात शुद्ध पाणी मिळते.

मुंबईला मोडकसागर, तानसा, अप्पर कैतरणा, मध्य कैतरणा, तुळशी, किहार क भातसा अशा सात धरणांमधून दररोज 3958 दशलक्ष लिटर पाणीपुरकठा केला जातो, मात्र तलावांतून येणारे पाणी शुद्ध केल्यानंतरच मुंबईकरांना पुरवले जाते. यामध्ये पिसे पांजरापूर जल शुद्धीकरण केंद्रावर 1820 दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया करण्याची व्यवस्था आहे. या ठिकाणी 1350 दशलक्ष लिटर पाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया केली जाते. तर भांडुप जल शुद्धीकरण केंद्रावर सुमारे 2500 दशलक्ष लिटर पाणी शुद्ध केले जाते. पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच सेवा जलाशयातून पाणीपुरवठा केला जातो.

मुंबईचे पाणी शुद्ध! दिल्लीतील पाण्याचा दर्जा तळाला

पालिका पाणी शुद्धीकरणासाठी दर्जेदार प्रक्रिया करीत असल्यामुळे गेल्या पाच वर्षांत मुंबईतील विविध भागांतील ‘अनफिट’ सॅम्पलमध्ये कमालीची घट झाली आहे. पाच वर्षांपूर्वी ‘अनफिट’ नमुन्यांचे 12 ते 17 पर्यंत असणारे प्रमाण गेल्या वर्षी चक्क 0.79 टक्क्यांवर आले आहे.

अशी होते जलशुद्धीकरण प्रक्रिया

  • सर्वात आधी तलावातून आलेल्या पाण्यातील गाळ खाली बसवण्याची प्रक्रिया केली जाते. गाळ खाली बसण्यासाठी पाण्याला पॉलिऍल्युमिनियम क्लोराईडचा डोसही दिला जातो. त्यानंतर पाणी वाळू असलेल्या थरातून फिल्टर केले जाते.
  • शुद्धीकरणाच्या प्रत्येक टप्प्यात क्लोरिनचा वापर केल्यामुळे पाण्यातीत बॅक्टेरियांचा नाश होतो. यासाठी पाणी महाजल संकलन टाक्यांमध्ये क्लोरिनच्या संपर्कात अर्ध्या तासासाठी पाणी साठवले जाते. पाण्याच्या शुद्धतेसाठी क्लोरिनचा वापर केला जात असला तरी प्रयोगशाळेत पाण्याची चाचणी केल्यानंतरच पाणीपुरवठा केला जातो.
आपली प्रतिक्रिया द्या