
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबापुरीला समुद्राच्या वाढत्या पातळीचा अजिबात धोका नाही. 2050 सालापर्यंत मुंबई बुडणार असे अमेरिकेतील संस्था म्हणते. परंतु हिंदुस्थानी संशोधकांवर विश्वास ठेवा, त्यांचे संशोधन पाहा आणि निर्धास्त राहा. मुंबई बुडणार नाही, असे केंद्रीय मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी मंगळवारी लोकसभेत सांगितले.
वैश्विक कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी केले नाही तर 2050 सालापर्यंत मुंबई, नवी मुंबई ही किनारपट्टीलगतची शहरे समुद्राच्या पाण्यात बुडतील, अशी भीती व्यक्त केली. याविषयी मंगळवारी काँग्रेस आणि समाजवादी पार्टीच्या खासदारांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला. त्यावर केंद्रीय मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी हिंदुस्थानातील संशोधक तसेच त्यांच्या संशोधनातील निष्कर्षावर विश्वास ठेवण्यास सांगितले. समुद्राची पातळी वाढून मुंबई बुडण्याचा कोणताही धोका नाही, असे ते म्हणाले.
1876 ते 2005 या कालावधीत मुंबईतील समुद्राच्या पातळीतील वाढ सरासरी 0.74 मिलीमिटरच्या आसपास राहिली आहे. 2050 पर्यंत ही पातळी 3.3 सेमीपर्यंत वाढण्याची शक्यता आहे, असेही डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितले.
आपले संशोधक जगात सर्वोत्कृष्ट
हिंदुस्थानी संशोधकांनी काढलेले निष्कर्ष संपूर्ण जगात सर्वोत्कृष्ट मानले जातात. दक्षिण मुंबईत 2040 ते 2050 या कालावधीत वर्षातून एकदाही पूर येण्याची शक्यता हिंदुस्थानी संशोधकांनी वर्तवलेली नाही, असे डॉ. हर्ष वर्धन यांनी नमूद केले.






















































