
बदलापूर येथील 56 वर्षीय महिलेच्या अवयवदानाने चौघांना जीवदान मिळाले तर दोघांना दृष्टी मिळाली आहे. मृत्यूपश्चात या महिलेचे फुप्फुस, यकृत, मूत्रपिंड आणि नेत्रपटल दान करण्यास त्यांच्या कुटुंबाने सहमती दिली. यामुळे सहा जणांना नवीन आयुष्य मिळाले आहे.
बदलापूर येथील महिला घरात घसरून पडल्याने तिच्या मेंदूला दुखापत झाली. या महिलेला 2 डिसेंबर रोजी मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारांना प्रतिसाद देत नसलेल्या या महिलेला काही तासांनंतर ब्रेन डेड घोषित करण्यात आले. तिच्या कुटुंबीयांचे समुपदेशन करून अवयवदानाबाबत माहिती देण्यात आली. या महिलेमुळे पाच जणांना नवीन जीवन मिळणार असल्याने कुटुंबीयांनीही तत्काळ परवानगी दिली. तिचे महत्त्वाचे अवयव चार रुग्णालयांना देऊन त्या माध्यमातून अनेकांचे जीवन सुधारण्यात आले. फोर्टिस रुग्णालयातील 29वे अवयवदान आहे. कुटुंबाने दिलेल्या या परवानगीमुळे झेडटीसीसी मुंबईचे महासचिव डॉ. भरत शहा, मुंबई अध्यक्ष माथूर यांनी या कुटुंबीयांचे आभार मानले.




























































