
राजेश चुरी | मुंबई
नव्या वर्षात महिलावर्गाला राज्य सरकारकडून चांगली बातमी मिळणार आहे. संकटग्रस्त महिलांना तातडीने मदत पुरवण्यासाठी सुरू केलेली 181 हेल्पलाइन नव्या वर्षात पुन्हा स्वतंत्रपणे महिलांसाठीच राखीव ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील महिलावर्गाला चोवीस तास मदतीचा हात मिळेल.
संकटग्रस्त महिलांना तातडीने मदत पुरवण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने ऑगस्ट 2014 मध्ये 181 ही हेल्पलाइन सुरू केली. या हेल्पलाइनचे कॉल सेंटर मुंबईत होते. आठ प्रशिक्षित कर्मचारी त्यासाठी नियुक्त केले होते. महिलांशी संबंधित विषय हाताळण्याचे विशेष प्रशिक्षण या कर्मचाऱयांना दिले होते.
अगदी छेडछाडीपासून कौटुंबिक हिंसाचार, हॉस्पिटल अशा कोणत्याही प्रकारची मदत पोलिसांच्या सहाय्याने मिळत होती. पण पुढे केंद्र सरकारच्या पुढाकाराने प्रत्येक राज्यात चिफ मिनिस्टर हेल्पलाइन सुरू झाली. त्यामुळे 181 ही हेल्पलाइन चिफ मिनिस्टर हेल्पलाइनमध्ये विलीन करण्यात आली.
181 या क्रमांकावर फोन केल्यास सीएम हेल्पलाइनवरही मदत मिळते. पण या हेल्पलाइनवर इतरही असंख्य प्रकारचे मदतीचे फोन येत असतात. त्यामुळे फक्त महिलांसाठीच राखीव हेल्पलाइन ठेवण्याची मागणी जोर धरू लागली. महिलावर्गाची ही मागणी लक्षात घेऊन राज्याच्या महिला व बालविकासमंत्री अॅड. यशोमती ठापूर यांनी पुढाकार घेऊन 181 हेल्पलाइन स्वतंत्रपणे महिलांसाठी राखीव ठेवण्याकरिता केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू केला. केंद्राने राज्याच्या प्रस्तावाला अनुपूलता दर्शवली आहे.
नव्या वर्षात 181 हेल्पलाइन महिलांसाठी स्वतंत्रपणे सुरू करण्यात 100 टक्के यश येईल. त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. केंद्राने मंजुरी द्यावी. यामध्ये राजकारण करू नये. – अॅड. यशोमती ठाकूर, महिला व बालविकास मंत्री




























































