मुंबईकरांना 15 ऑगस्टपर्यंत पाण्याचे नो टेन्शन!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईकरांना पाणीपुरवठा करणार्‍या सातही तलावांत सध्या मुबलक पाणीसाठा असल्याने १५ ऑगस्टपर्यंत पाण्याचे टेन्शन राहणार नाही. सध्या सातही तलावांत मिळून ४३१४१८ दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध आहे. मुंबईला दररोज होणारा ३८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा पाहता उपलब्ध असणारे पाणी पुढील ११४ दिवस म्हणजेच १५ ऑगस्टपर्यंत पुरणारे आहे.

मुंबईला मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा सात धरणांमधून दररोज ३८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मुंबईकरांना वर्षभर पुरेसे पाणी मिळण्यासाठी १ ऑक्टोबर रोजी सातही धरणांत मिळून १४४७३६३ दशलक्ष लिटर पाणी असणे आवश्यक असते. मात्र २०१८ मध्ये तलाव क्षेत्रात कमी पाऊस पडल्याने नोव्हेंबर २०१८ पासून मुंबईत १० टक्के पाणीकपात करावी लागली होती. २०१९ मध्ये झालेल्या जोरदार पावसानंतर जुलै २०१९ मध्ये पाणीकपात रद्द करण्यात आली होती. गेल्या दोन वर्षांची स्थिती पाहता यावर्षी मुंबईकरांसाठी पुरेसा पाणीसाठा असल्याने पाणीकपात करावी लागणार नाही असे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

लॉकडाऊनमुळे रिझर्व्ह कोट्यात भर

मुंबईकरांना पाणीपुरवठा करण्यासाठी सुमारे १०० ते १५० किमीवरून पाईपलाईनने पाणी आणले जाते. हे पाणी २४ विभागांत असणार्‍या टेकड्यांवरील भूमिगत जलाशयातून त्या त्या विभागात पुरवले जाते. मात्र सध्या लॉकडाऊनमुळे उद्योगधंद्याला लागणारे १५ टक्के पाणी टाक्यांमधील रिझर्व्ह कोट्यात शिल्लक राहत आहे. याचाही फायदाही मुंबईकरांना होणार आहे.

गतवर्षीच्या तुलनेत ३८ दिवसांचा वाढीव साठा

गेल्या वर्षी २५ एप्रिल रोजी सातही तलावांत मिळून २८८५३१ दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होते. म्हणजेच २० टक्के पाणी उपलब्ध होते. मात्र यावर्षी याच दिवशी उपलब्ध असणारे ४३१४१८ दशलक्ष लिटर पाणी ३० टक्के जास्त म्हणजेच ३८ दिवसांना पुरेल इतके वाढीव आहे.

२५ एप्रिल रोजीचा पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)
तलाव पाणीसाठा
अप्पर वैतरण २८०२
मोडक सागर ६१६३२
तानसा ३८५३९
मध्य वैतरणा ८९९५३
भातसा २२४८८१
विहार १०१३३
तुळशी ३४७८
एकूण ४३१४१८