
मुंबईकरांचा प्रवास अधिक गतीमान झाल्याचा दावा करणाऱ्या ‘महायुती’ सरकारच्या यंत्रणांच्या फसलेल्या नियोजनामुळे मंगळवारी मुंबईकरांचा जागोजागी खोळंबा झाला. मेट्रो, बेस्ट बससेवा आणि लोकल ट्रेनच्या वेळापत्रकाचा पुरता बोजवारा उडाल्याने संपूर्ण दिवसभर मुंबईकरांचे हाल झाले. उपनगरी रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर लोकल गाड्या २० ते ४० मिनिटे उशिराने धावल्या. एमएमआरडीएच्या अखत्यारितील मेट्रोचे वेळापत्रकही विस्कळीत झाले. त्यातच ठिकठिकाणी सुरू असलेल्या रस्ते खोदकामामुळे वाहनचालक आणि प्रवाशांची मोठी रखडपट्टी झाली.

मुंबईच्या उपनगरांतील बहुतांश रस्त्यांवर कुठे काँक्रीटीकरण, तर कुठे केबल टाकण्याच्या कामासाठी खोदकाम सुरू आहे. अनेक ठिकाणी दोन ते चार महिन्यांपासून रेंगाळलेली कामे सुरू असून त्याचा थेट फटका वाहतुकीला बसत आहे. पश्चिम व पूर्व उपनगरांतील नागरिकांना एकीकडे धुळीच्या त्रासाला सामोरे जावे लागत असताना, सकाळी व सायंकाळी प्रचंड वाहतूक कोंडीत अडकावे लागत आहे.
पूर्व उपनगरात लालबहादूर शास्त्री मार्ग, पूर्व द्रुतगती महामार्ग, रेल्वे स्थानकांकडे जाणारे अंतर्गत रस्ते, तर पश्चिम उपनगरात पश्चिम द्रुतगती महामार्ग, विमानतळ परिसर, जोगेश्वरी–विक्रोळी लिंक रोड, एस. व्ही. रोड आदी मार्गांवर मंगळवारी तीव्र वाहतूक कोंडी झाली होती. अवघ्या १५ मिनिटांच्या प्रवासासाठी वाहनचालकांचा पाऊण ते एक तास वाया गेला. स्कूल बसेसही कोंडीत अडकल्याने लहान मुलांचे मोठे हाल झाले.
शहर भागात वडाळा, प्रतिक्षानगर, परळ, दादर टीटी, माहीम परिसरातही वाहनांची मोठ्या प्रमाणात रखडपट्टी झाली. रस्ते वाहतुकीबरोबरच पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या लोकल सेवेचे वेळापत्रक कोलमडल्याने मुंबईकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. मध्य रेल्वेवर सकाळच्या सुमारास सीएसएमटीकडे येणाऱ्या लोकल गाड्या तब्बल ३० ते ४० मिनिटे उशिराने धावल्या. हीच परिस्थिती पश्चिम रेल्वेवरही पाहायला मिळाली. अनेक लोकल फेऱ्या रद्द झाल्या, तर काही गाड्या उशिराने धावल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
आज-उद्या बेस्टच्या १०२३ बसेस निवडणूक ड्युटीवर
बेस्ट उपक्रमाला आधीच अपुऱ्या संख्येत प्रवासी सेवा चालवावी लागत आहे. त्यातच बुधवारी व गुरुवारी बेस्टच्या १०२३ बसेस निवडणूक कार्यालयाने आरक्षित केल्या आहेत. निवडणूक कर्मचारी व निवडणूक साहित्याची ने-आण करण्यासाठी या बसेसचा वापर केला जाणार आहे. या दोन दिवसांत बसगाड्यांच्या कमतरतेमुळे प्रवासी सेवा विस्कळीत होणार असल्याचे बेस्टने मान्य केले आहे. मात्र कमी बसफेऱ्यांचे योग्य नियोजन न झाल्यास मुंबईकरांचा ‘बेस्ट प्रवास’ रामभरोसे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बेस्ट बसेसबरोबरच एसटी महामंडळाच्या १०३ गाड्याही निवडणूक ड्युटीवर तैनात राहणार आहेत.
मेट्रो-७ चे वेळापत्रक आठवडाभर विस्कळीत
पश्चिम उपनगरातील प्रवाशांच्या सोयीसाठी गुंदवली ते अंधेरी पश्चिमदरम्यान सुरू करण्यात आलेल्या मेट्रो-७ मार्गिकेचे वेळापत्रक गेल्या आठवडाभरापासून विस्कळीत आहे. सकाळच्या ‘पीक अवर्स’मध्ये अनेक गाड्या उशिराने धावत असल्याने कार्यालयात वेळेत पोहोचणे कठीण होत असल्याची प्रतिक्रिया गोरेगाव येथील प्रवासी अभिषेक नायर यांनी दिली.
सीएसएमटी स्थानकात प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक
मध्य रेल्वेचे प्रवासी रोजच्या विस्कळीत वेळापत्रकामुळे त्रस्त आहेत. रेल्वे प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराला वैतागलेल्या प्रवाशांनी मंगळवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात संताप व्यक्त केला. संतप्त प्रवाशांनी सीएसएमटी येथील स्टेशनमास्तर व उप-स्थानक व्यवस्थापक यांच्या कार्यालयात जाऊन जाब विचारण्यासाठी मोठी गर्दी केली. त्यांना तेथील अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. परिस्थिती काही काळ तणावपूर्ण झाली आणि गोंधळ निर्माण झाला. अखेर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी रेल्वेला सुरक्षारक्षकांना पाचारण करावे लागले.
मंगळवारी बेस्टच्या बससेवेचे वेळापत्रक कोलमडले होते. कित्येक बसथांब्यांवर अर्धा ते पाऊण तासांच्या फरकाने बस धावत होत्या. त्यामुळे अनेक रिक्षा व टॅक्सीचालकांनी प्रवाशांच्या गैरसोयीचा गैरफायदा घेत मनमानी भाडे वसूल केले.
बेस्टला आधीच अपुऱ्या संख्येत प्रवासी सेवा चालवावी लागत आहे. त्यातच बुधवारी व गुरुवारी १०२३ बसेस निवडणूक कार्यालयाने आरक्षित केल्या आहेत. निवडणूक कर्मचारी आणि निवडणूक साधनसामग्रीची ने-आण करण्यासाठी बसेसचा वापर केला जाणार आहे. मेट्रो सेवेच्या वेळापत्रकाची बोंबच होती. सायंकाळी बोरिवलीच्या दिशेने जाणाऱ्या अनेक गाड्या १५ मिनिटे उशिराने धावत होत्या.


























































