
मुंबईकरांना आरे ब्रॅण्डचे पिशवीबंद सकस दूध पुन्हा उपलब्ध व्हावे यासाठी आज महाराष्ट्र दूध वितरक सेनेने दुग्धव्यवसाय विकास आयुक्तांची भेट घेतली. महानंद दुग्धशाळेच्या सहकार्याने मुंबईच्या बाजारामध्ये उपलब्ध व्हावे याविषयी झालेल्या बैठकीत आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेत यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना लवकरच आरेचे पिशवीबंद दूध मिळणार आहे.
दुग्धव्यवसाय विकास आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत महानंद दुग्धशाळेचे व्यवस्थापकीय संचालकदेखील उपस्थित होते. यावेळी आरे ब्रॅण्ड दूध व दुग्धजन्य पदार्थ सुलभ वितरणाबाबत 15 मेपर्यंत आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश आयुक्तांनी संबंधित अधिकारी संघटना पदाधिकारी व वितरकांना दिले. आरे ब्रॅण्ड पुन्हा सुरू झाला की आरे स्टॉलधारकाचे अस्तित्वही टिकेल. तसेच मुंबईकरांना सकस दूध उपलब्ध होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी बृहन्मुंबई दूध योजना महाव्यवस्थापक गजानन तावडे, कार्याध्यक्ष राम कदम, सरचिटणीस सतीश सावंत, कोषाध्यक्ष विलास भुजबळ, सचिव अमित भुवड, धर्मेश भट, आरिफ दळवी, अनिल दळवी व रेखा संख्ये उपस्थित होते.





























































