
सफाई कर्मचाऱयांसाठी विकसित करण्यात आलेल्या होम लोन अॅपचे लाँचिंग आज मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी आणि क्लीन-अप फाऊंडेशनच्या संस्थापक संजना रुणवाल यांच्या हस्ते करण्यात आले. क्लीन-अप फाऊंडेशनने हे अॅप विकसित केले आहे. सफाई कामगारांना गृहनिर्माण वित्तसंस्थेच्या पर्यायांबद्दल माहिती मिळवण्यात हे अॅप मदत करणार असून त्यांच्या उत्पन्नाच्या आधारे त्यांची पात्रता, समान मासिक हप्ते (ईएमआय) किती असावेत यासाठी मदत करणार आहे. बहुतांश कामगार सध्या त्यांच्या कर्ज आणि आर्थिक गरजांसाठी सावकारांवर अवलंबून असतात, मात्र त्यात त्यांची अनेकदा फसवणूक होते. हे अॅप योग्य गृहनिर्माण वित्त पर्यायांबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या आणि त्याबद्दल त्यांना शिक्षित करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे. दरम्यान, या आधी संजना यांनी ‘सफाई कामगारांसाठी परवडणारे गृहनिर्माण उपाय’वर शोधनिबंध लिहिला होता. त्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते त्यांना प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले होते.



























































