
मुंब्रा रेल्वे अपघातप्रकरणी ठाणे रेल्वे पोलिसांनी मध्य रेल्वेच्या दोन इंजिनीयर्सवर गुन्हा दाखल केला आहे. तपासणी, पडताळणी व पाच महिन्यांच्या सखोल चौकशीनंतर रेल्वे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या दोन इंजिनीयर्सच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याचे स्पष्ट होताच जीआरपी पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून अन्य कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावरही गुन्हे दाखल होणार आहेत.
9 जून रोजी मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील धोकादायक वळणावर भीषण अपघात झाला. दोन धावत्या लोकलमधील 13 प्रवासी एकमेकांना आदळून खाली कोसळले. हा अपघात इतका भीषण होता की त्यात 4 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला होता तर 9 प्रवासी गंभीर जखमी झाले होते. या दुर्घटनेनंतर ठाणे रेल्वे पोलिसांनी घटनेची नोंद करत तपासाला सुरुवात केली होती. जीआरपीच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांमार्फत पाच महिन्यांपासून या प्रकरणाची चौकशी करत आहे. या तपासादरम्यान मुख्य अभियांत्रिकी आणि देखभालीच्या दुरुस्तीमधील चुकांचा आढावा घेण्यात आला. त्यात या दोन इंजिनीयर्सचा निष्काळजीपणा आढळून आल्याने ठाणे जीआरपीने शनिवारी रात्री त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
            
		





































    
    





















