धारावीत बेकायदा दुकाने, झोपडय़ांवर पालिकेचा बुलडोझर; जाणीवपूर्वक कारवाई केल्याचा रहिवाशांचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धारावी टी-जंक्शन येथील 10 ते 15 बेकायदा दुकाने व झोपडय़ांवर पालिकेने आज बुलडोझर फिरवला. यावेळी पोलीस-पालिका कर्मचारी आणि दुकानदार-झोपडीधारकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. दरम्यान, पालिकेने बेकायदा बांधकामांवर कारवाई केली असल्याचे सांगितले असले तरी या कारवाईवर संबंधित रहिवाशांनी पालिकेने ‘अदानी’च्या दबावाखाली जाणीवपूर्वक कारवाई केल्याचा आरोप केला आहे.

पालिकेवर दबाव आणून धारावीत रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली जाणीवपूर्वक कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी आमदार बाबूराव माने यांनी केला आहे.
‘धारावी’तील झोपडी-दुकानधारकांना कोणताही मोबदला न देता फुकटची जागा बळकावण्यासाठीच ही कारवाई केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. कारवाई करण्याआधी या ठिकाणी ‘अदानी’च्या माणसांनी येऊन दुकानधारकांना दमदाटी केली. कागदपत्रे अदानीच्या कार्यालयात जमा करण्यास सांगण्यात आले. मात्र संबंधित दुकानदारांनी आपण कागदपत्रे पालिकेकडे जमा केल्याचे सांगितले. आजच्या कारवाईत धारावी टी-जंक्शन येथील दहा ते बारा दुकाने आणि काही झोपडय़ा तोडल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, ही बांधकामे बेकायदा असल्यामुळे नोटीस बजावून कारवाई करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

अदानीची दादागिरी खपवून घेणार नाही

धारावीकर हक्कासाठी लढत आहेत, पण अदानी आता पालिकेच्या माध्यमातून दबाव आणून दादागिरी करीत आहे. आजच्या कारवाईदरम्यान पालिका कर्मचारी, पोलीस यांच्यासोबत रहिवाशांची बाचाबाची झाली.

मात्र भूमिपुत्र धारावीकर अदानीच्या दादागिरीला बळी पडणार नाही. आमचा लढा सुरूच राहील, असा इशाराही माने यांनी धारावीवासीयांकडून दिला. तर या ठिकाणी अनेक वर्षांपासून बेरोजगार मुलांनी व्यवसायासाठी दुकाने सुरू केली आहेत, मात्र पालिकेने आज दादागिरी करीत या ठिकाणच्या दुकानांवर अन्यायकारकरीत्या कारवाई केल्याचे स्थानिक जोसेफ निपोलस यांनी सांगितले.