
पालिकेने बेकायदा फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली असून पालिका आयुक्त भूषण गगराणी स्वतः रस्त्यावर उतरले आहेत. कांदिवलीत बेकायदा फेरवाल्यांविरोधात कारवाई करणाऱया पालिका कर्मचाऱयाला मारहाण करणाऱया घटनास्थळी आयुक्तांनी आज स्वतः जाऊन कारवाई केली. पुढील काळात ही कारवाई आणखी तीव्र होणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
कांदिवली येथील विश्वकर्मण्ये चौक (लोखंडवाला सर्कल) परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर महानगरपालिकेच्या आर (दक्षिण) विभागाकडून शनिवार 7 मार्च निष्कासनाची कारवाई करण्यात आली. ही कारवाई सुरू असताना जमावाकडून अधिकारी व कर्मचाऱयांना मारहाण करण्यात आली. तसेच, संयंत्रे आणि वाहनांची तोडपह्ड करण्यात आली. या पार्श्वभूमीवर, महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी रविवारी कांदिवली येथील लोखंडवाला सर्कल परिसरात भेट देऊन पाहणी केली. रस्त्यावर उभी करण्यात आलेली वाहने, पदपथांवर निर्माण झालेले अडथळे हे महानगरपालिका आयुक्त गगराणी यांनी प्रत्यक्ष उभे राहून निष्कासित कारायला लावले. तसेच, डिलिव्हरीच्या दुचाकी उभ्या करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱया पिझ्झा दुकानाला तात्काळ बंद करण्याचे निर्देश दिले. यावेळी उपायुक्त (परिमंडळ 7) डॉ. भाग्यश्री कापसे, सहायक आयुक्त (आर दक्षिण विभाग) आरती गोळेकर, महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते.
‘त्या’ विद्यार्थ्यावरही कारवाई
नियमानुसार कारवाई करून सेवा बजावणाऱया अधिकारी- कर्मचाऱयांवर अशाप्रकारे हल्ला करणाऱयांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्रशासनाकडून या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. हल्ला करणाऱया जमावात अनधिकृत फेरीवाल्यांसोबत काही स्थानिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचाही सहभाग असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांच्या संबंधित महाविद्यालयांना याबाबत सूचना देऊन कारवाई करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी यावेळी संबंधित अधिकाऱयांना दिल्या.
फेरीवाल्यांविरोधात गुन्हा नोंद
कारवाईसाठी गेलेल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱयासह कर्मचाऱयांशी फेरीवाल्याने हुज्जत घातल्याची घटना घडली. याप्रकरणी समता नगर पोलिसांनी पाच फेरीवाल्यांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार हे पालिकेत वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करतात. शुक्रवारी ते त्यांच्या पथकासोबत कांदिवलीच्या लोखंडवाला सर्कल येथे अनधिकृत फेरीवाल्याविरोधात कारवाई करत होते. कारवाई सुरू असताना पाच जण तेथे आले. त्याने अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी हुज्जत घालून शिवीगाळ केली. तसेच त्यांच्या अंगावर धावून गेले. त्या पाच जणांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केला. त्या घटनेने लोखंडवाला परिसरात काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती समजताच समता नगर पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा नोंद केला.


























































