
बोगस नकाशांच्या आधारे मढ-मनोरी येथे अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या बंगल्यांसह अनधिकृत बांधकामांवर पालिकेची तोडक कारवाई सुरूच असून आज आणखी चार बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. त्यामुळे आतापर्यंत तोडल्या गेलेल्या बांधकामांची संख्या 44 वर पोहोचली आहे. मुंबई महापालिकेच्या पी-उत्तर विभागाने ही कारवाई केली.
बोगस नकाशा दाखवून गेल्या वर्षभरापासून मढ परिसरात अनधिकृत बांधकामे उभारण्यात आली आहेत. अशा प्रकारच्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेकडून सातत्याने कारवाई सुरू आहे. मुंबई महापालिका उपायुक्त (परिमंडळ-4) भाग्यश्री कापसे आणि पी-उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त पुंदन वळवी यांच्या नेतृत्वात ही तोडक कारवाई सुरू आहे. 3 ते 5 जूनदरम्यान करण्यात आलेल्या कारवाईत ‘जिनिव्हा’ रिसॉर्टसह अन्य तीन बांधकामे तोडण्यात आली. यामध्ये अनुक्रमे 6900 व 2300 चौरस फुटांचे प्रत्येकी एक आणि 150 चौरस फुटांच्या दोन बांधकामांचा समावेश आहे. दोन जेसीबी आणि अन्य यंत्राच्या सहाय्याने या अनधिकृत बांधकामांचे पाडकाम करण्यात आले. या कारवाईदरम्यान महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी यांच्यासह पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.