पालिका कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवापूर्वी मिळणार सुधारित भत्त्याची थकबाकी

मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या विविध भत्त्यामध्ये 2009 नंतर आता पहिल्यांदाच भत्त्यांमध्ये 100 टक्क्यांनी वाढ करण्यात आली असून यातील 50 टक्के थकबाकीची रक्कम कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवाआधी मिळणार आहे. यामुळे पालिकेच्या हजारो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या विविध भत्त्यामध्ये वाढ करून सुधारणा करावी या मागणीसाठी समन्वय समितीकडून सातत्याने मागणी केली जात होती. 2009 नंतर भत्त्यात सुधारणा झालेली नाही. कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात वाढ करून सुधारणा करण्यात यावी याबाबत पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची समन्वय समितीने सोमवारी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी, डॉ. अमित सैनी आदी उपस्थित होते. बैठकीत कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर चर्चा झाली. यावेळी प्रलंबित मागण्यांबाबतही आयुक्त गगराणी यांनी सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याचे समन्वय समितीचे बाबा कदम, अ‍ॅड. प्रकाश देवदास यांनी सांगितले. बैठकीसाठी समन्यय समितीकडून बाबा कदम, अ‍ॅड. प्रकाश देवदास, अशोक जाधव, वामन कविस्कर, दिवाकर दळवी आदी उपस्थित होते.

या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा

1 सप्टेंबर 2024 पासून चालू केली जाणारी नवीन गटविमा योजना, रामनाथ झा समितीच्या अहवालाची लवकरच अंमलबजावणी केली जाईल, पी.टी. केसेस व प्रकल्पग्रस्तांची भरती करण्यात येईल, रुग्णालयात घनकचरा व्यवस्थापन या अत्यावश्यक सेवेमध्ये येतात, त्यांचीही तत्काळ भरती करण्यात येईल, एमएमआरडीए., बीईएसटी कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी, निवृत्तीवेतन आदीसाठी पालिकेचे फिक्स डिपॉझिट तोडून रक्कम दिली जाणार नाही. पदोन्नतीची पदे त्वरित भरली जातील.