
मुंबई महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता जलकामे (परिरक्षण) रमेश भुतेकर (देशमुख) हे शनिवारी सलग 35 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले. म्युनिसिपल मजदूर युनियन आणि म्युनिसिपल इंजिनीअर्स असोसिएशन यांच्यावतीने भुतेकर यांचा सेवापूर्ती निरोप समारंभ घाटकोपर येथील जल अभियंता यार्डातील सभागृहात झाला. यावेळी मानपत्र प्रदान करून त्यांच्या प्रदीर्घ सेवेचा सन्मान करण्यात आला.
पालिकेच्या सेवेत असताना भुतेकर यांनी महापालिकेतील महत्त्वाच्या विविध पदांवर काम केले. मुंबईच्या जलवाहिन्यांना लागून करण्यात येणारा सायकल ट्रक प्रकल्प, पवई तलावाचे सुशोभीकरण आणि पुनरुज्जीवन, पालिकेच्या जल विभागातील विविध जलाशयांची स्थापत्य कामे, जल अभियंता विभागातील मलबार हिल, वरळी, भंडारवाडा उद्यानांचा लोकाभिमुख विकास, विविध कामांचे सुशोभीकरण इत्यादी महत्त्वाच्या प्रकल्पांवर त्यांनी काम केले आहे. म्युनिसिपल इंजिनीअर्स असोसिएशन या अभियंत्यांच्या संघटनेच्या उपाध्यक्षपदी ते कार्यरत आहेत. निरोप समारंभ कार्यक्रमावेळी माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, आमदार रमेश कोरगावकर, माजी नगरसेवक अॅड. मंगेश बनसोड, म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अॅड. सुखदेव काशीद, पद्मभूषण वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे सरचिटणीस अॅड. आप्पासाहेब देसाई, म्युनिसिपल इंजिनीअर्स असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी जल अभियंता टी. व्ही. शहा, जल अभियंता अजय राठोर व उपायुक्त ( पर्यावरण) सुनील गोडसे आदी उपस्थित होते.



























































