मुनोत दाम्पत्याच्या मारेकऱयाला फाशीची शिक्षा ; पाचजणांची जन्मठेप कायम; संभाजीनगर खंडपीठाचा निकाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

नगरमधील उद्योजक रमेश मुनोत व चित्रा रमेश मुनोत या दाम्पत्याची अत्यंत नियोजनबद्ध आणि कट-कारस्थान रचून निर्घृण हत्या करून दरोडा घालण्यात आला होता. या हत्याकांडाचा सूत्रधार शिवकुमार साकेत याला फाशी, तर पाचजणांना जन्मठेपेची शिक्षा कायम करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाचे न्या. व्ही. के. जाधव व न्या. एस. डी. कुलकर्णी यांनी दिला.

सर्वोच्च न्यायालयातील काही प्रकरणांच्या आधारे आणि दुर्मिळातील दुर्मिळ घटना म्हणून नोंद घेत अतिरिक्त सरकारी अभियोक्ता शशिभूषण देशमुख यांनी युक्तिवादात मुख्य सूत्रधार शिवकुमार याला फाशीची शिक्षा देण्याची विनंती खंडपीठाकडे केली होती. रमेश मुनोत यांची ‘क्लासिक व्हील’ ही कंपनी आहे. त्यांच्या कंपनी आणि बंगल्याच्या सुरक्षेचे काम मध्य प्रदेशातील सुरक्षारक्षा एजन्सीला देण्यात आले होते. बुरूडगाव रस्त्यावरील चंदन इस्टेट वसाहतीमध्ये मुनोत यांचा बंगला आहे. 2 डिसेंबर 2007 रोजी घटनेच्या दिवशी मुनोत यांची दोन्ही मुले बाहेरगावी गेली होती. साकेत हा बंगल्याचा सुरक्षारक्षक म्हणून काम करीत होता. त्याने साथीदार राजू दरोडे, शैलेंद्रसिंह ठाकुर, राजेशसिंह ठाकुर, संदीप पटेल व बलेंद्रसिंह ठाकुर (सर्व रा. रेवा, मध्य प्रदेश) यांना बोलावून घेतले. मुनोत यांच्या बंगल्यात घुसून त्यांनी चित्रा मुनोत यांना खुर्चीवर बांधून गळा चिरून हत्या केली. त्याचप्रमाणे रमेश यांच्या छातीत धारदार शस्त्र्ा खुपसून त्यांची हत्या केली होती.

याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात मुनोत दाम्पत्याचे पुतणे सुनील मुनोत यांनी फिर्याद दिली. या प्रकरणाची नगर जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली होती. न्यायालयाने शिवकुमारसह सहाही जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली
होती. या शिक्षेविरोधात आरोपींनी खंडपीठात अपील दाखल केले, तर सरकारकडून फाशीची शिक्षा सुनावण्यासाठी अपील दाखल केले. यामध्ये खंडपीठाने शिवकुमार याची जन्मठेपेची शिक्षा फाशीत परिवर्तित केली, तर इतर आरोपींची जन्मठेप कायम ठेवली. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता देशमुख यांनी युक्तिवाद केला.