
भरधाव टेम्पो एसटी बसवर आदळून झालेल्या अपघातात टेम्पोमधील १३ प्रवासी जमखी झाले. जखमींमध्ये महिलांचाही समावेश आहे. ही दुर्घटना मुरुड-अलिबाग मार्गावर विहूर येथील वाकड्या आंब्याच्या वळणावर आज दुपारी घडली. सर्व जखमी हे माजगाव आणि नांदगाव येथील असून ते मुरुड येथील कोटेश्वरी देवीचे दर्शन घेऊन अलिबागच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. सर्व जखमींना मुरुड-अलिबाग येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अलिबाग येथून मुरुडच्या दिशेने निघालेली एसटी बस (एमएच २० बीएल ३६४०) ही दुपारी दीडच्या सुमारास मुरुड-अलिबाग मार्गावरील विहून परिसरातील वाकड्या आंब्याच्या वळणावर आली असता या बसला समोरून येणाऱ्या टेम्पोची (एमएच ०६ बीडब्ल्यू ४६३३) जोरदार धडक बसली. या टेम्पोमधून माजगाव आणि नांदगाव येथील भाविक मुरुडमधील कोटेश्वरी देवीच्या दर्शनासाठी आले होते. देवदर्शन झाल्यानंतर ते सर्व अलिबागकडे निघालेले होते. त्यावेळी हा अपघात झाला.