किरकोळ वादातून एकाची हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । मुंबई

किरकोळ वादातून एकाची हत्या झाल्याची घटना गुरुवारी रात्री कांदिवलीच्या डहाणूकरवाडी परिसरात घडली. दीपक शिवराम घाग (58) असे मृताचे नाव आहे. त्याच्या हत्येप्रकरणी उमेश नारायण नायकला कांदिवली पोलिसांनी अटक केली.

कांदिवली पश्चिमच्या डहाणूकरवाडी येथे शिवशंकर नावाची एसआरएची इमारत आहे. त्या इमारतीत दीपक हा रहिवासी राहत होता. गुरुवारी सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाला एकाने मारहाण केली. मारहाणीची माहिती कळताच रात्री सोसायटीचे सदस्य इमारतीखाली आले. सुरक्षा रक्षकाला मारहाण करणाऱ्याला पकडून पोलिसांकडे द्यावे अशी चर्चा सुरू होती तेव्हा उमेश आणि दीपक यांच्यात वाद झाला. वादावादीत दीपकने उमेशच्या श्रीमुखात भडकवली तेव्हा रागाच्या भरात उमेशने दीपकला पेव्हर ब्लॉक फेकून मारला. त्यात दीपक हा जखमी झाला. त्याला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले पण तेथे दीपकचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती कळताच कांदिवली पोलीस घटनास्थळी गेले. पोलिसांनी गुन्हा नोंद करून काही तासांतच उमेशला अटक केली. त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंद केला. उमेशला अटक करून शुक्रवारी न्यायालयात हजर केले. त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.