किरकोळ वादातून भावानेच केला भावाचा खून; जिंतूर तालुक्यातील सायखेडाची घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिंतुर तालुक्यातील चारठाणा गावापासुन 6 कि.मी. अंतरावर असलेल्या मौजे सायखेडा येथील रामराव किसनराव जाधव आणि शेषेराव किसनराव जाधव या दोघां भावाभावाच्या भांडणात एका भावाने दुसऱ्या भावाची कुऱ्हाडीने वार करीत हत्या केली आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी 7.30 वाजता सायखेडा येथे घडली.

मृताची पत्नी सावित्रीबाई शेषेराव जाधव यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. घरासमोरील कडबा शेळीला खाऊ देऊ नको असे, शेषेराव यांनी भाऊ रामराव यांना सागितले होते. यावरून त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर शेषेराव आपल्या आईला आपल्या भावाच्या घरासमोरुन जेवण करण्यासाठी घेऊन जात असताना रामराव यांनी आपल्या हातात कुऱ्हाड घेतली आणि ‘माझ्या घरासमोरुन जायचे नाही, असे म्हणत शेषेरावशी भांडण केले. भांडण वाढत जाताच रागाच्या भरात रामराव यांनी हातातील कुऱ्हाडीने शेषेराव यांच्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. शेषेराव यांच्या मुलाने त्यांना जिंतुर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्यांच्यावर प्रथमोपचार करुन पुढील उपचारासाठी परभणी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. परभणी येथील रुग्णालयात उपचारादरम्यान शेषेराव यांचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच जिंतूर पोलीस उपविभागीय अधिकारी प्रकाश एकबोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बी.एस. जमादार व पोलीस उपनिरीक्षक प्रदीप अल्लापुरकर व बिट जमादार आय.ऐ. ईनामदार, डी.डी. बुकरे, बळीराम ईघारे, सुर्यवंशी, भानुसे आदी कर्मचाऱ्यांनी सायखेडा येथील घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. आरोपी रामराव किसनराव जाधव यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच याप्रकरणी चारठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास आय.ऐ. इनामदार, डी.डी. बुकरे करीत आहेत.