पुण्यात प्रियकराची क्रूरता…प्रेयसीचा गळा आवळून केले तुकडे; आरोपीला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
murder

लग्नानंतरही तरूणीसोबत अफेअर करून मानसिक त्रासामुळे तिचा गळा आवळून खून करुन तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी टाकणाऱ्या प्रियकराला खंडणी विरोधी एक पथकाने अटक केली आहे. प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्यानंतर दोन दिवसांनी तिचे कोयत्याने तुकडे करीत मुंडके, हात-पाय कापून वेगवेगळे केले. शरीराचे तुकडे पोत्यात भरुन लवासा घाट परिसरात ठिकठिकाणी टाकून दिले होते. रोझिना रियाज पानसरे ऊर्फ कविता चौधरी (वय 30) असे खून करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. हनुमंत शिंदे ( वय 40, रा. बुधवार पेठ, पुणे) याला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

बुधवार पेठेत राहणारी रोझिना मागील 10 ते 12 दिवसांपासून बेपत्ता झाली होती. तिचा प्रियकरानेच खून केल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाचे पोलीस नाईक राजेंद्र लांडगे यांना मिळाली होती. खबऱ्याच्या माहितीनुसार मोबाईल रिपेअरिंगचा व्यवसाय करणाऱ्या आरोपी हनुमंत शिंदे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. रोझिनासोबत शरीरसंबध असल्यामुळे तिला नारायण पेठेत भाडयाने घर घेऊन दिले होते, असे त्याने चौकशीत सांगितले. मात्र विवाह झालेला असल्याने हनुमंत त्याच्या घरीही जात होता. त्यामुळे रोझिनाला हनुमंतचे वागणे खटकत होते. त्यामुळे ती हनुमंतला घरी जाऊ नको, माझ्यासोबतच रहा, असे बोलून शिवीगाळ करुन सतत मानसिक त्रास देत होती.

रोजिनाने 12 ऑगस्टला हनुमंतला तू दिवसभर का घरी आला नाही, असे सांगत वाद घालत शिवीगाळ केली. त्यामुळे रागाच्या भरात हनुमंतने तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर घर बंद करुन तो अक्कलकोट येथे निघून गेला. त्यानंतर 14 ऑगस्टला रात्री मित्राचा चारचाकी छोटा टेम्पो घेऊन तो रोझिनाच्या घरी गेला. तेथे त्याने रोझिनाच्या शरीराचे शस्त्राने मृतदेहाचे तीन तुकडे केले. तिच्या शरीराचे तुकडे ताडपत्रीच्या पिशवीत भरुन भुगाव ते लवासा घाट परिसरात वेगवेगळया ठिकाणी टाकून दिले.

याप्रकरणी खंडणी विरोधी पथकातील खबऱ्यांचे नेटवर्क असलेल्या राजेंद्र लांडगे यांना आरोपीची कुणकुण लागली. त्यानुसार त्याला ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी सुरेंद्रनाथ देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, एपीआय संदीप बुवा, पांडुरंग वांजळे, यशवंत ओंबासे, मधुकर तुपसौंदर, रवींद्र फुलपगारे, प्रवीण राजपुत, अतुल साठे, नितीन कांबळे, रमेश चौधर, अमोल आवाड, दुर्याधन गुरव, गजानन सोनवलकर, राजेंद्र लांडगे, विवेक जाधव, नितीन रावळ, विजय कांबळे, प्रफुल्ल चव्हाण, अमर पवार, पिराजी बेले, हनुमंत कांदे यांनी केली.