विरोधीपक्षनेते विखे यांच्या विरोधातील पुनर्विलोकन अर्ज सत्र न्यायालयात करा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

शेत जमिनीच्या वादावरून प्रवरा साखर कारखान्यातील अभियंता केशव कुलकर्णी यांचा संगनमत करून खून केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राजेंद्र विखे पाटील यांच्यावर केला. या दोघांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशा आशयाची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर येथील खंडपीठात दाखल केली. न्यायमूर्ती व्ही. एम. देशपांडे यांच्यासमोर सुनावणी झाली असता जिल्हा व सत्र न्यायालयात पुनर्विलोकन अर्ज सादर करता येत असल्यामुळे त्या मार्गाचा अवलंब करण्यात यावा, असे मत खंडपीठाने नोंदविले.

प्रवरा साखर कारखान्यात अभियंता पदावर कार्यरत असलेल्या केशव कुलकर्णी यांची शेतजमीन प्रवरा वैद्यकीय महाविद्यालयाच्या शेजारी आहे. या शेतजमीनीवर विखे पाटील यांचा डोळा होता. त्यातूनच संगणमत आणि कट रचून कुलकर्णी यांचा खून केला असल्याची फौजदारी संहितेनुसार प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी राहता न्यायालयात बापू दिघे यांनी तक्रार केली. न्यायालयाने तक्रारदारची विनंती फेटाळून लावल्यामुळे त्याने अ‍ॅड. सतीश तळेकर यांच्या मार्फत खंडपीठात धाव घेतली. न्यायमूर्ती व्ही. एम. देशपांडे यांच्या समोर सुनावणी झाली असता जिल्हा व सत्र न्यायालयात पुनर्विलोकन अर्ज करण्यासाठी योग्य त्या मार्गाचा अवलंब करण्यात यावा, असे मत खंडपीठाने व्यक्त केले. याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. प्रज्ञा तळेकर, अजिंक्या काळे यांनी बाजू मांडली.