पूर्ववैमन्यस्यातून हल्ला; काकाचा मृत्यू, पुतण्या जखमी

सामना प्रतिनिधी । श्रीक्षेत्र माहूर

माहुर तालुक्यातील सिंदखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गोकुळ गोंडेगाव येथे जुन्या वादातून आनंद केशव भगत (४५) याची निर्घृण हत्या करण्यात आली. तर मयताचा पुतण्या समाधान मुकुंद भगत (२७) हा आपल्या काकाला वाचविण्यासाठी मध्ये पडला असता त्याच्या गुप्त अंगावर चाकूचे वार केल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्याला गंभीर अवस्थेत पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे. सदरची घटना पोळ्याच्या दिवशी सायंकाळी ४.३० च्या सुमारास घडली. याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला.

तालुक्यातील गोकुळ गोंडेगाव येथे दि.९ सप्टेंबर रोजी विनयभंगाच्या जुन्या घटनेवरून दोन गटात वाद उफाळून आला. विनयभंग प्रकरणी मयत आनंद केशव भगत याला न्यायालयाने दोषी ठरविले होते. परंतु नुकतेच वरिष्ठ न्यायालयाने त्याला निर्दोष मुक्त केले. त्याचा राग मनात धरून काल पोळा सणाच्या दिवशी आरोपी प्रितेश विजय मानकर, सतीश विजय मानकर, देवानंद नथ्थु भगत, गौतम नथ्थु भगत, कुसुमबाई विजय मानकर, विजय एकनाथ मानकर, रुपेश विजय मानकर, निर्मलाबाई गौतम भगत, स्नेहा गणपत भगत यांनी पूर्ववैमन्यस्यातून सापळा रचून सामुहिकरित्या आनंद केशव भगत याच्यावर धारधार चाकूने अंगावर व पोटावर सपासप वार करून खून केला. तर पुतण्या समाधान मुकुंद भगत हा वाचविण्यासाठी गेला असता त्याच्या गुप्त अंगावर चाकूने वार करण्यात आले. त्यात तो गंभीररित्या जखमी झाला.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी आसाराम जहारवाल, माहूरचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण राख, सहायक पोलीस निरीक्षक घोडके यांनी माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात जाऊन परिस्थिती जाणून घेतली. मयत आनंद केशव भगत याचे दि.१० सप्टेंबर रोजी शवविच्छेदन करण्यात आले आहे. सिंदखेड पोलिसात ९ जणांविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी आसाराम जहारवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मल्हार शिवरकर हे करीत आहे.