लिव्हइनमध्ये राहणाऱ्या तरुणीच्या डोक्यात खलबत्ता घातला, जागीच मृत्यू

1264
प्रातिनिधिक फोटो

लिव्हइनमध्ये राहणाऱ्या तरुणाने तरुणीच्या डोक्यात खलबत्त्याने वार करून तिचा निर्घृण खून केल्याची घटना नागपूरमधील वाडी हद्दीतील सम्राट अशोक चौक येथे घडली. हत्येनंतर तरुण स्वत: पोलीस ठाण्यात दाखल झाला आणि खुनाची कबुली दिली. सिद्धार्थ प्रेम सोनपिपळे (35) असे आरोपीचे नाव असून अल्का (28) असे मृत तरुणीचे नाव आहे.

वाडी हद्दीतील सम्राट अशोक चौक देशभ्रतार यांच्या घरामागे, आंबेडकरनगर येथे सिद्धार्थ राहतो. मागील 3 महिन्यांपासून त्याच्यासोबत अल्का (28) नावाची तरुणी लिव्हइनमध्ये राहात होती. अल्काने तिच्या पतीला सोडले होते. तिला आधीच्या लग्नापासून कोणतेही अपत्य नव्हते. तर सिद्धार्थ यानेसुद्धा पहिल्या पत्नीला सोडले होते. त्याला दोन अपत्ये असून दोघेही त्यांच्या आईजवळ राहतात.

सिद्धार्थ एका कंपनीत पेंटरचे काम करतो तर अल्का ही गृहिणी होती. मंगळवारी अल्का रात्री निघून गेली आणि बुधवारी सकाळी घरी आली. यावरून सिद्धार्थने तिला जाब विचारला असता दोघांत कडाक्याचे भांडण झाले. रागाच्या भरतात सिद्धार्थने घरातील खलबत्ता उचलून तिच्या डोक्यावर घातला. यात तिचा जागीच मृत्यू झाला.

हत्या केल्यानंतर काही काळ तो गावातच फिरत होता. रात्रीच्या सुमारास स्वत: पोलीस ठाण्यात गेला आणि त्याने घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी त्याला घेऊन घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी अल्काचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. पोलिसांनी सिद्धार्थला अटक केली असून त्याच्याविरुद्ध कलम 302, 201 अन्वये गुन्हा दाखल करण्यात केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या