
गुहागर तालुक्यातील पिंपर मठवाडीतील अनंत विश्राम देवळे यांचा खून करणाऱ्या दोन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी आज मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
13 ऑगस्ट रोजी रात्री अज्ञात व्यक्तींनी अनंत देवळे (50) यांच्यावर धारदार हत्याराने हल्ला करून खून केला. देवळे यांच्या कपाळावर, डोक्यावर आणि शरीराच्या अन्य भागावर गंभीर दुखापत करून त्यांना ठार मारण्यात आले होते. या गुन्ह्याच्या तपासात 36 साक्षीदार तपासले होते. काही दिवसांनी हा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांच्याकडे सोपावण्यात आला होता. देवळे यांच्या घरातून सोन्याची चेन, नथ, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले. खून होण्यापूर्वी काही दिवस अगोदर एक तरूण सफेद रंगाची अॅक्टिवा घेऊन अनंत देवळे यांच्या घराची पाहणी करून गेला होता. मला शिकारीची आवड आहे. मी यापरिसरात डुक्कर मारून आणला तर तुम्ही मला काही साहित्य लागल्यास मदत कराल का? असे विचारले होते. तोच धागा पकडून आरोपीचा शोध सुरू झाला. पोलिसांनी सागर दिनेश साळवी (26 रा.जामसूद मराठवाडी गुहागर) आणि योगेश मनोहर मेस्त्री (35, रा. मेढा मालवण) यांना अटक केली आहे.
आरोपीनी अनंत देवळे यांना घराबाहेर बोलावून त्यांना घराच्या पाठीमागे नेऊन त्यांचा खून केला व त्यांच्या घरातील सोने-चांदीचे दागिने आणि 4500 रुपयांची रोकड लंपास केली होती, अशी माहिती डॉ.प्रवीण मुंढे यांनी दिली. यावेळी अपर पोलीस अधिक्षक विशाल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, पोलीस निरीक्षक शिरीष सासने, अरविंद बोडके उपस्थित होते.



























































