
सामना प्रतिनिधी । मुरुड
मुरुड हे गाव लातूर, धाराशिव, आंबेजोगाई यांना मध्यवर्ती गाव आहे. त्यामुळे येथील बसस्थानकामध्ये आजूबाजूच्या किंवा लांब जाणाऱ्या एसटी बस साठी मोठ्या प्रमाणात आजूबाजूच्या खेडेगावातून नागरीक बस स्थानकामध्ये येत असतात. पण येथील बसस्थानकामध्ये कोणत्याही सोयीसुविधा नसल्यामुळे मुरुड बस स्थानकाचा अक्षरश: उकिरडा झाला आहे.
येथील बसस्थानकामध्ये सध्याच्या झालेल्या पावसामुळे बसस्थानकाच्या समोरील बाजूस मोठे मोठे खडे पडून पाणी साचलेले आहे. अशामध्ये एखादी एसटी बस त्या पाण्यामधून जात असताना जवळ उभे असणार्या प्रवाशांच्या अंगावर चिखलाचे पाणी येत आहे. तसेच मुरुड बसस्थानकांमध्ये असलेले शौचालय फार जुने झाले असून त्यामधून जाणारे सांडपाणी हे बसस्थानकाच्या मागच्या बाजूस उघड्यावर सोडून देण्यात आलेले आहे. त्यामुळे बसस्थानकामध्ये दुर्गंधी पसरली आहे. तसेच बस स्थानकामधील शौचालय वेळेवर न उघडता सकाळी नऊ नंतरच ते उघडले जाते. त्यामुळे बाहेरगावाहून आलेल्या प्रवासी उघड्यावरच शौचास बसत आहे. त्यामुळे शाळेचे, विद्यालयाचे, महाविद्यालयाचे, विद्यार्थी – विद्यार्थिनींना व महिला प्रवासी किंवा वयोवृद्ध प्रवासी यांना नाकाला रूमाल लावून एसटीची वाट पहात बसावे लागत आहे. बस स्थानकाच्या पुढच्या बाजुस पाण्याने साचलेले खड्डे व मागच्या बाजूस मुतारी किंवा उघड्यावर शौचालयासाठी बसलेले नागरिक यामुळे मुरूडच्या बस स्थानकाला बस स्थानक म्हणावे की उघड्यावरचे शौचालय म्हणावे असा भ्रम लोकांमध्ये निर्माण झालेला आहे. अशामध्ये बस स्थानका मधील शौचालय पाडून नवीन शौचालय उपलब्ध करून द्यावे, बस स्थानकाच्या समोरील खड्डे त्वरीत बुजवावेत. गटारे दुरूस्त करावीत, त्यातील गाळ काढावा आगी मागण्या प्रवाशांकडून करण्यात येत आहेत.




























































