मुरुडचे सरपंच अपात्र, अप्पर विभागीय आयुक्तांचा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तांनी लातूर जिल्ह्यातील मुरुड तालुक्याचे सरपंच अपात्र असल्याचा ठपका ठेवत कारवाई केली आहे. अनेक आरोपांमध्ये दोषी आढळल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. अभयसिंह नाडे असं या सरपंचाचं नाव आहे.

मालमत्ता कर आकारणी फेर सर्व्हे करण्यासाठी प्रत्येक निवासी मालमत्ता धारकाकडून 200 रुपये प्रमाणे व व्यावसायिक कडून 500 रुपये प्रमाणे वसुली करणे, तसेच एकूण 25 ते 30 लाखांचे काम विना ई-टेंडर दिले जाणे, बाजार लिलाव प्रक्रिया पूर्णपणे बोगस व नियमबाह्य राबवणे, प्रोसेडींग बुक कोरे ठेवणे, त्यावर खाडाखोड करणे, जमाखर्च ठराव कोरे ठेवणे, मासिक बैठका, ग्रामसभा वेळेवर न घेणे, कर्तव्यात कसूर करणे असे विविध आरोप मुरुड सरपंचांवर आहेत.

तसेच, निष्क्रिय व बेजबाबदार कारभार करणे तसेच सर्व सदस्यांना विश्वासात न घेणे ग्रामपंचायतीच्या खात्यावरुन बेकायदेशीरपणे लाखो रुपये ऊचलणे व भ्रष्टाचार करणे यासारख्या अनेक आरोपांमध्ये सरपंच पूर्णपणे दोषी आढळल्यामुळे विभागीय आयुक्तांनी मुरुडचे सरपंच अभयसिंह नाडे यांना संरपंच पदावरून अपात्र ठरविले आहे. नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून त्यामुळे मुरुड मधील चौका-चौकात हा एक विषय चर्चेचा विषय बनला आहे.