दिवाळी पहाटचे सूर ‘डिजिटल’ मंचावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यंदाची दिवाळी वेगळी आहे. कोरोनाच्या संकटात अनेक मर्यादा, नियमांसह आपण दिवाळी साजरी करत आहोत. दिव्यांचा उत्सव आणि दिवाळी पहाट मैफिलीचे सूर ही आपली परंपरा आहे. यावर्षी लाईव्ह मैफलींचा आनंद घेता येणार नाही. मात्र डिजिटल मैफलीतून सूरांचा दीपोत्सव साजरा होत आहे.

दिवाळीच्या पहिल्या दिवशी विविध संस्थामार्फत ’दिवाळी पहाट’ मैफिलींचे आयोजन केले जाते. लोक एकमेकांना शुभेच्छा देत संगीत मैफिलींचा आस्वाद घ्यायला घराबाहेर पडतात. अशा कार्यक्रमांना रसिकांची मोठी गर्दी जमते. गायक कलावंत, आयोजक देखील वर्षभर या क्षणांच्या प्रतीक्षेत असतात. दिवाळीच्या तेजोमय प्रकाशात रसिकांना कलास्वाद देण्यासाठी ते आतुर असतात. यंदा लाईव्हची मजा नसली तरी रसिकांना घरबसल्या ऑनलाईन मैफिली बघता येणार आहेत. फेसबुक, युट्युब अशा सोशल माध्यमांतून कार्यक्रमांचा विनाशूल्क आनंद घेता येईल. अशा कार्यक्रमांचे शूटींग नुकतेच पूर्ण झाले आहेत. उद्या त्यांचे प्रिमीयर होणार आहेत. काही कार्यक्रम सशूल्क आहेत.

’भक्तीसंगीत सरिता’ या सुमधूर भक्तिगीतांच्या डिजिटल कार्यक्रमाची पर्वणी रसिकांना देणार आहोत. रविवारी, 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 6.30 ते 8.30 या वेळेत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर तसेच फेसुबक आणि युट्युब पेजवर कार्यक्रम सादर होईल. पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूर यांच्या सहकार्याने आयोजन करण्यात आले आहे. पुढील महिन्यात लावणी, शाहिरी तमाशावर आधारित डिजिटल कार्यक्रम सादर करणार आहोत.
बिभीषण चवरे, संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई

’रंगात रंगली दिवाळी’ हा ऑनलाईन कॉन्सर्ट कार्यक्रम 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 6.30 वाजता सुरू होईल. दिग्गज कलाकारांच्या गप्पांसोबत रसिकांना संगीतमय डिजिटल मेजवानी द्यायचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही रंगाई एन्टरटेन्मेंटतर्फे गेली 19 वर्षे दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करतो. यंदा लाईव्ह कार्यक्रमात खंड पडला आहे. मात्र ऑनलाईन कार्यक्रम युरोप, अमेरिका, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, युएई येथील रसिकांसाठीही लिंकच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहोत. एका तिकिटावर पूर्ण फॅमिली पुढील 72 तासांत हा कार्यक्रम केव्हाही बघू शकते.
दिगंबर प्रभू, निर्माते, रंगाई एन्टरटेन्मेंट

यावर्षी लाईव्ह कार्यक्रमांच्या आयोजनावर मर्यादा असल्याने आम्ही ऑनलाईन मैफलीचा पर्याय निवडला. ’प्रभाती सूर नभी रंगती’ या आमच्या कार्यक्रमाचा युट्युब प्रीमियर शनिवारी सकाळी होईल. या कार्यक्रमाचे शूटींग आम्ही नुकतेच पूर्ण केले. लाईव्ह कार्यक्रमाला जेवढा खर्च येईल, तेवढाच डिजिटल शूटींगला झाला. कुठेही तडजोड केली नाही. दिवाळीपर्यंत कोरोनाचे संकट दूर होईल, अशी आशा होती. पण तसे काही झाले नाही. गायक, कलावंत, तंत्रज्ञ यांचे खूप नुकसान झालेय.
अर्चना विनित गोरे, आर्च एंटरप्रायजेस

मी गेल्या 15 वर्षांपासून दिवाळी पहाटचे कार्यक्रम करतोय. दिवाळी पहाट म्हणजे आम्हा कलाकारांची दिवाळी असते. दिवाळीच्या पाचही दिवसांमध्ये आम्ही कार्यक्रम करतो. मात्र यावर्षी एकही कार्यक्रम नाही. दिवाळी पहाटचे कार्यक्रम मुंबईतच नव्हे तर मुंबईबाहेर कार्यक्रम असल्यामुळे दरवर्षी आमची दिवाळी प्रवासात जाते. मैफिलींची तयारी, लगबग हे सारं यावर्षी ’मिस’ करतोय. यंदा डिजिटल कार्यक्रम आहेत. मात्र ते लाईव्ह स्ट्रिमिंगचे नाहीत. त्यांचे प्रीशूट झालेले आहे. उद्या दिवाळीच्या पहिल्या दिवशी ते विविध माध्यमांतून प्रसारित होतील.
अनिरुद्ध जोशी, गायक