वारिस पठाणचा शिरच्छेद करणाऱ्याला 11 लाख देणार, मुस्लीम संघटनेची घोषणा

4652

एमआयएमचा माजी आमदार वारिस पठाण याच्या वादग्रस्त विधानाचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. मुजफ्फरपूर इथल्या एका मुस्लीम संघटनेने पठाण याचा पुतळा जाळून निषेध केला असून पठाण याचा शिरच्छेद करणाऱ्याला 11 लाख रुपये इनाम म्हणून दिले जातील, अशी घोषणा केली आहे.

झी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, मुजफ्फरपूर येथील कंपनी बाग रोडवरील हक-ए-हिंदुस्थान मोर्चा या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पठाण याच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला असून तो देशद्रोही असल्याचं म्हटलं आहे. हक-ए-हिंदुस्थानच्या राष्ट्रीय संयोजक तमन्ना हाश्मी यांच्या म्हणण्यानुसार, वारिस पठाण याची भाषा पाकिस्तानची भाषा आहे, देशद्रोह्यांची भाषा आहे. आणि आम्ही आमच्या संघटनेतर्फे ही घोषणा करतो की अशा दहशतवाद्याचा शिरच्छेद करणाऱ्याला 11 लाख रुपये बक्षीस म्हणून देऊ, असं हाश्मी यांचं म्हणणं आहे.

कर्नाटकात गुलबर्गा येथे सभेत बोलताना पठाणचा तोल गेला आणि तो बरळला. 100 कोटींवर (हिंदू) आम्ही 15 कोटी (मुसलमान) भारी पडतील. आम्हाला स्वातंत्र्य दिले जात नसेल तर मिळवावे लागेल, अशी धमकी ‘एमआयएम’चा माजी आमदार वारिस पठाणने दिली होती. वारिस पठाण याच्या हिंदूविरोधी चिथावणीखोर भाषणामुळे एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी हे अडचणीत आले आहेत. देशभरात उमटलेले पडसाद आणि पक्षातील कुरबुरीनंतर अखेर ओवेसी यांनी वारिस पठाण याच्या विरोधात कारवाईचे पाऊल उचलले आहे. वारिस पठाण याला मीडियासमोर बोलण्यास बंदी घालण्यात आली आहे. पक्ष परवानगी देत नाही तोपर्यंत वारिस पठाण याने कोणतीही प्रतिक्रिया देऊ नयेत, असे सक्त आदेश त्याला देण्यात आलेले आहेत.

या विधानानंतर वारिस पठाण याने आपण कोणत्याही धर्माचे नाव घेतले नसल्याचा खुलासा केला होता आणि माफी मागण्यासही नकार दिला होता. मात्र हा मुद्दा यावर संपला नाही. देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली.

आपली प्रतिक्रिया द्या