आमचं ठरलंय… मटण 500 रुपये किलो; वसईकरांचा निर्धार

1018
mutton-1

महिन्याभरापूर्वी 460 रुपये किलो दराने विकले जाणारे मटण चक्क काही दुकानात 540, काही ठिकाणी 560 रुपयांना वसईत विकले जाते, तर काही मनमानी दुकानदारांनी मटणाचा दर 580 रुपयांपर्यंत वाढवला आहे. मटण विक्रेत्यांच्या अंदाधुंद भाववाढीवर वसईकर संतापले असून ‘आमचं ठरलंय’ या उक्तीनुसार ‘एकच दर 500 रुपये किलो मटण’ असा निर्धार केला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना परवडेल असे मटण दर निश्चित करा, मटण विक्रीत ग्राहकांची फसवणूक करू नये, या मागण्यांचे निवेदन शिवसेनेच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांना दिले आहे.

रविवार म्हटलं की मटणाच्या दुकानाबाहेर सर्वसामान्य रांगा लावतात. मात्र काही दिवसांपूर्वी वसईत मटणाचा भाव 460 रुपये प्रतिकिलो असा होता. त्यात वाढ करून विक्रेत्यांनी 500 रुपये प्रतिकिलो भाव केला, तर महिना पूर्ण होत नाही. तोच हा भाव 540 पुढे 560 रुपये असा झाला. यासोबत वसईत काही ठिकाणी 560 रुपये तर काही ठिकाणी 580 रुपये प्रतिकिलो भाव घेतला जातो. इतकेच नव्हे तर बोकडाचे मटण सांगून मेंढय़ाचे स्वस्त मटण ग्राहकांना देऊन त्यांची फसकणूक केली जाते. मेंढय़ाचे मटण बोकडापेक्षा स्वस्त दरात खरेदी केले जात असून त्यांच्या मटणाची विक्री काही विक्रेते चढय़ा दराने करतात. त्यामुळे ग्राहकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती आहे, तर मटण आरोग्यास बाधक ठरू नये, यासाठी लसीकरण करणे गरजेचे असते. मात्र वसईत बोकडांचे लसीकरण केले जात नसल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने या मटण विक्रीविरोधात शिवसेना सर्वसामान्यांच्या पाठीशी उभी राहिली आहे.

…अन्यथा आंदोलनाचा इशारा

मटणाबाबत वसईतील नागरिकांच्या सातत्याने तक्रारी येत असल्याने शिवसेना वसई शहरप्रमुख प्रथमेश राऊत यांनी याबाबत वसई तहसीलदार किरण सुरवसे यांना निवेदन दिले. यावेळी विभागप्रमुख राजू पाटकर, प्रल्हाद कांबळे, अजिंक्य घरत, यश कांबळे, सुनील मिश्रा आदी उपस्थित होते. मटण विक्रेत्यांनी भाव स्थिर न ठेवता नागरिकांच्या जीवाशी खेळ केल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दिला.

आपली प्रतिक्रिया द्या