My lady Luck

768

अभिजीत केळकर – तृप्ती तांबे

 मधुचंद्र म्हणजे? – एकमेकांना समजून घेणं. पुढे जे आपल्याला एकत्र आयुष्य घालवायचे आहे त्याची सुरुवात त्याचा पाया म्हणजे मधुचंद्र.

फिरायला जाण्याचे प्लॅनिंग कसे केले? – फिरायला आम्ही महाबळेश्वरला गेलो होतो. माझ्या बायकोने सगळं प्लॅनिंग केलं होतं. तिला हे सगळं करायला आवडतं आणि त्यात ती एक्स्पर्ट आहे.

तिथे आवडलेले ठिकाण? – महाबळेश्वरला असलेले वेण्णा तलाव फार आवडले होते. त्या तलावाजवळ स्ट्रॉबेरी क्रिम मिळतात. डिसेंबरमध्ये लग्न झालं होतं त्यामुळे तिथे भरपूर थंडी होती. आम्ही तिथे पाण्यापासून उडण्यापर्यंत सगळय़ा गोष्टी केल्या होत्या. पाचगणीला पॅराग्लायडिंग केले होते.

तिथे केलेली शॉपिंग – बरीच केली होती. आम्ही तिथून नातेवाईक, मित्रमंडळींना भेट म्हणून खूप ब्लँकेटस् घेतली होती.

काही खास क्षण – मधुचंद्राला सगळेच हवेत असतात, पण आम्ही खरोखरच हवेत होतो. आम्ही तिथे अनुभवलेला पॅराग्लायडिंगचा क्षण आमच्यासाठी खास होता. खरं तर ते आमच्या प्लॅनिंगमध्ये नसल्याने पुरेसे पैसेही आम्ही हातात घेतले नव्हते. जेवढे नेले होते ते खर्च झाले होते. त्यामुळे थोडेफार पैसे होते. त्यांच्याशी मी कसेतरी बार्गेन केले. खूप बार्गेन करून जेवढे पैसे होते ते सगळे पॅराग्लायडिंगवर खर्च केले आणि पॅराग्लायडिंग केले तो क्षण खूप वेगळा होतो. आम्ही तेव्हा आकाशात पक्षासारखे उडत होतो. असा अनुभव एरव्ही आपण घेत नाही. तो खास क्षण होता.

मधुचंद्र हवाच की… – हवाच. नवरा-बायको या दोघांना एकमेकांना जाणून घेण्यासाठी स्पेस मिळते. एरव्ही नातेवाईक सगळे भेटायला येतात, तो माहोल तसा असतो नवरा-बायकोला भेटण्याचा, पण त्यात एकमेकांना जाणून घेण्यासाठी स्पेसची गरज असते.

एकमेकांना ओळखण्यासाठी किती दिवस द्यावेत… – खरं तर पटकनही ओळखतो एखाद्याला असंही बोलू शकतो आणि आयुष्यभर एखाद्या सोबत राहिल्यानंतरही एखाद्याला ओळखू शकत नाही असा तो माणूस एखाद्या प्रसंगात वागून जातो. उदाहरण म्हणजे माझ्या लग्नाला बारा ते तेरा वर्षे झाली. पण बिग बॉसच्या घरात असताना मला इतकी काळजी होती की माझी बायको माझ्या मुलांना घेऊन एकटी राहत होती. माझ्या सासूबाई माझ्याबरोबर होत्या, पण मी बीग बॉसच्या घरात जाण्याआधी दीड महिनाआधी त्या वारल्या. त्यामुळे आमचा जो आधार होता तो गळून पडला होता. असं म्हटलं तरी चालेल. खरं तर मी जाण्यासाठी साशंक होतो. त्यामुळे त्यांच्या काळजीत होतो. पण जेव्हा मी परत आलो आणि जेव्हा बायकोशी बोललो तेव्हा बारा-तेरा वर्षांत बायको, मुलांबद्दल जे ओळखू शकलो नाही त्यांच्याबद्दल जी इमेज होती त्याच्या अगदी विरुद्ध ते दिसले. इतके स्ट्राँग ते राहिले आणि माझ्या बायकोने इतकं स्ट्राँगली त्यांना सांभाळले, त्यांना समजावले होते. त्यांना खूप आठवण यायची. पण तिने खूप छान पद्धतीने त्यांना हॅण्डल केलं. मी जी तिला ओळखत होतो त्यापेक्षा ती जास्त स्ट्राँग आहे. एक वेगळीच बायको या तीन महिन्यांत सापडली. असे प्रसंग येतात ज्यामुळे वेगळंच माणूस आपलं सापडतं.

तिथला आवडलेला खाद्यपदार्थ – स्ट्रॉबेरी क्रिम.

अनोळखी ठिकाण की रोमँटिसीजम – रोमँटिसीजम. एकमेकांना बांधून ठेवण्याची यशस्वी मंत्र आहे. त्याने संसारात एक जिवंतपणा कायम ठेवतो.

जोडीदाराकडून मिळालेली भेटवस्तू – बायकोने सरप्राईज गिफ्ट दिले होते. त्यावेळी माझ्या बायकोने मला एक मॉन्युमेण्ट्स गिफ्ट केले होते. त्यातील लाईट लावल्यावर आमच्या दोघांचा फोटो त्यात दिसायचा. काचेचे हार्ट शेपचे ते होते. खाली बेस होता तिथे लाईट ऑन करायचे बटण होते. लाईट ऑन केल्यावर ते फिरायचे आणि आमच्या दोघांचा फोटो यायचा. मस्त गिफ्ट होते. तो प्रसंग खास होता.

मधुचंद्रानंतरचा संसारातील जोडीदार – अतिशय स्ट्राँग. जेवढा विचार केला त्यापेक्षाही जास्त स्ट्राँग, लव्हिंग आणि मी माझं आयुष्य पुढचं इतकं छान होईल इतकं सुखी, समाधानी असेल याची कधी कल्पना  देखील केली नव्हती. माझ्या आयुष्यातला ती लेडी लक आहे. माझं करीअर आणि आयुष्य लग्नानंतर माझ्या बायकोमुळे बदललं. त्यानंतर माझ्या आयुष्याचा इन ऍण्ड आऊट कायापालट झाला. तोपर्यंत मी पेइंगगेस्ट म्हणून बाहेर राहत होतो आणि अचानक लग्न ठरलं. मला समजून घेणारी, कायम प्रोत्साहन देणारी अशी बायको भेटली. ती कुठल्याही परिस्थितीत आनंदी राहील अशीच आहे. खूप चढ-उतार पाहिले त्या प्रत्येक प्रसंगात ती स्ट्रँगली उभी होती. त्यामुळे आज मी जो काही आहे तो फक्त तिच्यामुळे.

आपली प्रतिक्रिया द्या