कोविडमुक्त रत्नागिरीसाठी माझी रत्नागिरी माझी जबाबदारी अभियान

ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि आजारी पडल्यानंतर ग्रामस्थ उशिराने रूग्णालयात जात असल्याने वाढलेले मृत्यूचे प्रमाण लक्षात घेऊन जिल्ह्यात माझी रत्नागिरी  माझी जबाबदारी हे अभियान पुन्हा राबविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या अभियानातून घरोघरी जाऊन तपासणी करत कोविड रूग्णांचा शोध घेतला जाणार आहे.

1 मे पासून या अभियानाची करण्यात आली असून 15 मे पर्यंत हे अभियान सुरू रहाणार आहे. माझे कुटूंब माझी जबाबदारी या अभियानाच्या धर्तीवर माझी रत्नागिरी माझी जबाबदारी हे अभियान राबविले जात आहे. अभियानात पाच जणांचे पथक तयार करण्यात आले असून त्यामध्ये ग्राम कृती दल अध्यक्ष, तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस, आशा स्वयंसेविका, पोलीस पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे.

शहरी भागात नगरसेवक, वार्ड वसुली कर्मचारी, सफाई मुकादम, शिक्षक, अंगणवाडी सेविकेचा समावेश आहे. दररोज 50 घरांना भेटी अभियानातील पथके दररोज 50 घरांना भेटी देऊन ग्रामस्थांची तपासणी करणार आहेत. तपासणीत ऑक्सिजन पातळी 95 टक्के पेक्षा कमी असल्यास तसेच ताप, सर्दी आणि खोकला असल्यास त्यांना आरोग्य केंद्रात पाठविण्यात येणार आहे.तसेच कोविड बाबत हि पथके जागृती करणार आहेत. कोविड होऊन गेलेल्या व्यक्तींनी कशी काळजी घ्यावी याची माहिती ही पथके देणार आहेत.

एक पथक 15 दिवसात 750 कुटूंबाना भेटी देऊन पहाणी करतील. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर विलगीकरण कक्ष सुरू करण्यात येणार असून शाळा किंवा सभागृह ताब्यात घेऊन तिथे विलगीकरण कक्ष सुरू केले जाणार आहेत असे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या