नाळ-2 येतोय, शूटींगला सुरुवात

2018 साली प्रदर्शित झालेल्या नाळ चित्रपटाला चित्रपट प्रेमींच्या हृदयात विशेष स्थान आहे. बाल कलाकार श्रीनिवास पोकळे याची भूमिका विशेषार्थाने सिने रसिकांना आवडली होती. त्याला या भूमिकेसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटात दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि अभिनेत्री देविका दफ्तरदार यांनीही उत्तम भूमिका साकारल्या होत्या. हे तिघेही जण पुन्हा एकत्र आले आहेत. नाळ चित्रपटाचा दुसरा भाग येत असून त्याच्या शूटींगला सुरूवात झाली आहे. नागराज मंजुळे याने फेसबुक पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.

नागराज मंजुळे याने फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “मागच्या महिन्यात सुधाकर यक्कंटीने  (Sudhakar Yakkanti) अचानक फोन करून सांगितलं की नाळचा दुसरा भाग लिहिलाय. ऐकायला कधी भेटुयात ? नाळ चा दुसरा भाग काय होऊ शकतो याबाबत माझ्याही मनात उत्सुकता तयार झाली. स्क्रिप्ट ऐकली ती इतकी अनपेक्षित तरीही सहज नि भारी होती की दोन महिन्यांच्या जय्यत तयारीनिशी फिल्मचं शूटिंग झटक्यात सुरू केलं.

पहिल्या “नाळ” प्रमाणेच ‘नाळ’चा दुसरा भागही संस्मरणीय होईल अशी आशा आहे !

“नाळ 2″ नावानं चांगभलं !!!”