ऍथलेटिक्सच्या उत्तेजकमुक्तीचा ‘नाडा’चा निर्धार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

हिंदुस्थानी ऍथलेटिक्स क्षेत्र उत्तेजकविरहित राखण्याचा निर्धार राष्ट्रीय उत्तेजक सेवन प्रतिबंधक एजन्सीने (नाडा) व्यक्त केला आहे. त्यामुळे येत्या टोकियो ऑलिम्पिकला जाणाऱया हिंदुस्थानच्या सर्व ऍथलिटसची किमान 3 ते 4 वेळा डोपिंग चाचणी घेण्याचे नाडाने ठरवले आहे. नाडाचे महासंचालक नवीन अग्रवाल यांनी ही घोषणा केली आहे.

टोकियो ऑलिम्पिकसाठीच्या टीम इंडियाला उत्तेजक सेवनापासून दूर ठेवून प्रामाणिक आणि कष्टाळू ऍथलिटसचा संघ घडविण्याचे आमचे मुख्य लक्ष्य आहे असे सांगून नाडाचे महासंचालक अग्रवाल म्हणाले, जागतिक डोपिंग एजन्सीच्या (वाडा) डोपिंगमुक्त खेळ संकल्पनेनुसार आम्ही आमचे प्रमुख ध्येय गाठण्याचे प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. टोकियो ऑलिम्पिकला अजून एक वर्ष उरले आहे. त्यामुळे या वर्षभरात होणाऱया ऑलिम्पिक चाचणी स्पर्धांच्या वेळेस आम्ही खेळाडूंची स्पर्धापूर्व डोपिंग चाचणी अचानक घेणार आहोत. या चाचण्यांतून आम्हाला उत्तेजक देवाण करणाऱया दोषी खेळाडूंची अचूक ओळख मिळणार आहे. म्हणूनच या वेळेस ऑलिम्पिकपूर्वी आम्ही किमान 3 ते 4 वेळा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू शकतील अशा आणि टार्गेट ऑलिम्पिक पोडियमच्या (टॉप) ऍथलिटसच्या उत्तेजक सेवन चाचण्यांवर विशेष भर देण्याचे ठरवले आहे.

क्रीडा महासंघांची मोठी जबाबदारी

नाडाचे अधिकारी जेव्हा ऍथलीटस्च्या डोपिंग चाचण्यांसाठी रक्त अथवा लघवीचे नमुने गोळा करतील तेव्हा त्या-त्या विशिष्ट खेळाडूंना चाचणीसाठी हजर करणे आणि या चाचणीस सहकार्य करायला लावणे ही देशातील विविध क्रीडा महासंघांची मोठी जबाबदारी आहे. असे सांगून यापूर्वी काही असे प्रसंग आले की, नाडाच्या अधिकाऱयांना पाहताच अनेक खेळाडूंनी स्पर्धेतून धूम ठोकली होती. असे प्रसंग न टाळता नाडाशी असहकार करणाऱया क्रीडा महासंघांना निलंबन अथवा बडतर्फीची शिक्षा देणे हा एकच उपाय उरतो, असा इशाराही नाडाचे महासंचालक नवीन अग्रवाल यांनी दिला.