नागालँडमध्ये घडणार इतिहास, विरोधी पक्षाशिवाय चालणार सरकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागालँडमध्ये लवकरच इतिहास घडणार आहे. नागालँडमध्ये विरोधी पक्षाशिवाय सरकार स्थापन होणार असून नागालँड अशा प्रकारचे देशातील पहिले राज्य सरकार असणार आहे. नागालँडमध्ये सर्व राजकीय पक्षांनी मिळून सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

नागालँड विधानसभेतील सर्व राजकीय पक्षाच्या आमदारांनी सर्वपक्षीय सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव मान्य केला असून सरकारी पक्ष आणि विरोधी पक्षांनी हातमिळवणी केली आहे. या सरकारला संयुक्त लोकशाही आघाडी असे नाव देण्यात आले असून भाजपही या सरकारमध्ये सामील होणार आहे.

राजधानी कोहिमामध्ये मुख्यमंत्री नेफियू रियो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पाडली. या बैठकीत विरोधी पक्षाने सरकारसोबत सत्तेत सामील होण्यास होकार दिला आहे. मुख्यमंत्री रियो यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. या सरकारमध्ये एनडीपी, भाजप, एनपीएफ आणि अपक्ष आमदारांनी या निर्णयाला सर्वसहमतीने पाठिंबा दिला आहे.