अनिल देशमुखांच्या नागपुरातील घरांवर ‘ईडी’चा छापा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंमलबजावणी संचालनालयाने अनिल देशमुख यांच्या काटोल आणि वडविहिरा येथील घरांची झाडाझडती सुरू केली आहे. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ईडीच्या रडारवर आलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या दोन मालमत्तांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. आज रविवारी अनिल देशमुख यांच्या नागपूरमधील काटोल आणि वडविहिरा येथील निवासस्थानी ईडीने छापा टाकला. सकाळी आठ वाजता ही कारवाई करण्यात आली.

कारवाईचं वृत्त पसरताच देशमुख यांच्या समर्थकांनी बंगल्याबाहेर मोठी गर्दी केली होती. यावेळी कारवाईविरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीही केली.

अनिल देशमुख यांचे दिवाणजी (शेतीचे व्यवहार बघणारे) पंकज देशमुख यांना ईडीच्या पथकाने चौकशीकरिता नरखेड तालुक्यातील वडविहिरा येथून काटोल येथे आणले होते. चौकशीनंतर पंकजला सोडून दिले आहे. ईडीच्या पथकाला अनिल देशमुख यांच्या काटोल आणि वडविहिरा या गावातील वाडय़ात काहीही मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.