
कोरोना महामारीत मोठय़ा प्रमाणात ऑक्सिजनची कमतरता जाणवली. ऑक्सिजन ही कमतरता दूर करून प्रत्येक जिल्हा ऑक्सिजन निर्मितीच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावा यासाठी राज्य सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. ऊर्जा विभागाच्या महानिर्मिती कंपनीनेदेखील यासाठी पुढाकार घेतला असून कामठी येथील उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यात आला आहे. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते याचे लोकार्पण करण्यात आले.
महानिर्मितीतर्फे सामाजिक दायित्व निधीतून व पीएसए तंत्रज्ञानावर उभारण्यात आलेला हा प्लांट आहे. महाजेनकोचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे, संचालक (संचलन) चंद्रकांत थोटवे, कार्यकारी संचालक अभय हरणे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्लांटची अवघ्या 18 दिवसांत उभारणी करण्यात आली. औष्णिक विद्युत केंद्रांत निर्माण होणाऱया ओझोन वायूचा उपयोग करून रुग्णांसाठी मेडिकल ऑक्सिजनची निर्मिती करण्यात आली आहे. यातून दररोज 65 ते 70 रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा होणार आहे. या प्लांटमधून 95 टक्के एवढय़ा शुद्धतेचा प्राणवायू उपलब्ध होणार आहे.





























































